बाॅलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात सलमान खान आणि त्याचा शेजारी केतन कक्कर यांच्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार वाद सुरु आहे. सलमान याने कक्कर याच्याविरुद्ध गुन्हाही दाखल केला आहे. त्यानंतर त्यांच्यातील भांडण सुरुच आहे. आता तर कक्कर याने सलमानवर अतिशय गंभीर आरोप केले असून, त्यामुळे मोठी खळबळ उडालीय..
मुंबईतील वांद्रे उपनगरात राहणाऱ्या सलमानचे रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे फार्म हाऊस आहे. मोकळ्या वेळात सलमान तेथे जात असतो. त्याच्या फार्म हाऊसशेजारीच कक्कर याचे प्लाॅट आहेत.. सलमानच्या दाव्यानुसार, केतनने एका यू-ट्युबरशी बोलताना त्याच्याविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केली होती.
कक्कर याच्याविरुद्ध सलमान खानने न्यायालयात धाव घेतली. तसेच यू-ट्यूब, फेसबुक, ट्विटर व गुगलसारख्या सोशल मीडिया साइट्सलाही पक्षकार बनवले होते. त्यांच्या वेबसाइट्सवरून प्रसिद्ध करण्यात आलेल्या बदनामीकारक मजकूर काढण्याचे निर्देश देण्याची मागणी सलमानने केली आहे.
AdvertisementView this post on Instagram
Advertisement
दरम्यान, एकीकडे हा सगळा वाद सुरु असताना, कक्कर याच्याकडून सलमानवर आरोपांच्या फैरी सुरुच आहेत. आता तर त्याने सलमानवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सलमानवर सनसनाटी आरोप..
सलमानचे वकील प्रदीप गांधी यांनी कोर्टासमोर केतन कक्करची पोस्ट व मुलाखत वाचून दाखवली. त्यात त्याने म्हटले आहे, की सलमानचे ‘डी गँग’सोबत संबंध आहेत. तसेच सलमानच्या धर्मावरही भाष्य केलंय. केंद्रातील पक्ष व राज्य पातळीवरील नेत्यांसोबतही त्याचे जवळ संबंध आहेत. सलमान ‘चाइल्ड ट्रॅफिंग’मध्ये गुंतला असून, त्याच्या फार्म हाऊसवर चित्रपट कलाकारांचे मृतदेह पुरले जातात, असा सनसनाटी आरोप कक्कर याने केला आहे.
आरोपांवर सलमानचे उत्तर
कक्कर याच्या आरोपांवर सलमानने आपल्या वकिलांमार्फत प्रत्युत्तर दिले. ‘या सर्व आरोपांबाबत कोणताही पुरावा नाही. मालमत्तेच्या वादात माझी वैयक्तिक प्रतिमा खराब केली जात आहे. माझ्या धर्मात ढवळाढवळ कशाला? माझी आई हिंदू, वडील मुस्लिम नि भावांनीही हिंदू मुलींसोबत लग्न केलंय. आम्ही सगळे सण साजरे करतो.’
‘तू एक सुशिक्षित व्यक्ती आहेस. असे आरोप करायला गुन्हेगार नाहीस. आजकाल सर्वात सोपी गोष्ट म्हणजे, काही लोकांना एकत्र करणे आणि सोशल मीडियावर राग व्यक्त करणे. माझी राजकारणात जाण्याची इच्छा नाही..,’ असेही सलमानने पुढे म्हटले आहे.