क्रिकेट रसिकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. इंडियन प्रीमियर लीग.. अर्थात आयपीएल (IPL-2022) यंदा कुठे होणार, या प्रश्नाचे उत्तर अखेर समोर आले आहे. भारतात कोरोनाचा कहर सुरु असला, ओमायक्राॅनचे संकट असले, तरी यंदाची आयपीएल भारतातच होणार असल्याचे ‘बीसीसीआय’कडून जाहीर करण्यात आले आहे.
यंदा भारतातच ‘आयपीएल-2022’ होणार असून, येत्या 27 मार्चपासून मुंबईत यंदाचा हंगाम सुरू होणार आहे. मात्र, कोरोनाचा धोका लक्षात घेऊन, प्रेक्षकांना मैदानात प्रवेश दिला जाणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे टीव्ही, मोबाईलवरच चाहत्यांना आयपीएलचा आनंद घ्यावा लागणार आहे..
सगळे सामने मुंबईत..?
‘आयपीएल’चे आयोजन हे फक्त मुंबईतच असणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियम, क्रिकेट क्लब ऑफ इंडिया व डी.वाय. पाटील स्टेडियमवर सगळे सामने खेळविण्यात येणार आहेत. मात्र, गरजेनुसार पुण्यातही काही सामने खेळवले जाऊ शकतात.
‘बीसीसीआय’ला ही संपूर्ण स्पर्धा महाराष्ट्रातच खेळवायची आहे. त्यासाठी त्यांचे प्रयत्नही सुरू आहेच. ‘बीसीसीआय’च्या प्रतिनिधींनी नुकतीच मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटील व ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यात सकारात्मक चर्चा झाली. मुंबई व पुणे येथील कोरोना परिस्थिती आवाक्याबाहेर गेल्यास ‘यूएई’, तसेच तिसरा पर्याय म्हणून दक्षिण आफ्रिकेचाही विचार सुरू असल्याचे समजते..
दिग्गज खेळाडूंची माघार..
दरम्यान, बंगळुरूमध्ये येत्या 12 व 13 फेब्रुवारीला ‘आयपीएल’साठी ‘मेगा ऑक्शन’ होणार आहे. यापूर्वी 10 संघांनी 33 खेळाडूंना रिटेन केले आहे. उर्वरित खेळाडूंचा लिलावात समावेश होणार आहे.
लिलावासाठी तब्बल 1214 खेळाडूंनी नोंदणी केलीय. त्यात सहयोगी देशांच्या 41 खेळाडूंचा समावेश आहे. त्यात 49 खेळाडूंची सर्वाधिक 2 कोटींची बेस प्राईस आहे. त्यात 17 भारतीय, तर 32 विदेशी खेळाडूंचा समावेश आहे.
दरम्यान, यंदाच्या ‘आयपीएल’मधून अनेक दिग्गज खेळाडूंनी माघार घेतलीय. या यादीत टी-20 क्रिकेटचा ‘युनिव्हर्स बॉस’ ख्रिस गेल याचे नाव नाही. त्यामुळे त्याच्या चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केलंय. शिवाय मिचेल स्टार्क, बेन स्टोक्स, सॅम कुरन, जोफ्रा आर्चर आणि ख्रिस वोक्स हे खेळाडूही लिलावात दिसणार नाहीत..
यंदाच्या आयपीएलमध्ये अहमदाबाद, लखनऊचे संघ दाखल झाल्याने स्पर्धेचे नियम व स्वरूपही बदलले आहे.
नवे नियम
– 2011 मध्ये 10 संघ खेळले होते, तोच फॉरमॅट 2022 मध्येही असेल.
– 10 संघांची प्रत्येकी पाच-पाच अशा दोन गटांत विभागणी करण्यात येईल
– गटातील प्रत्येक संघ एकमेकांशी दोन आणि दुसऱ्या गटातील संघाशी एक सामना खेळतील.
– साखळी फेरीत प्रत्येक संघ 14 सामने खेळतील. विजयी संघाला 2 गुण, तर सामना अनिर्णीत राहिल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण मिळेल.