शालेय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. मागील 20 दिवसांपासून बंद करण्यात आलेल्या शाळा व महाविद्यालये येत्या सोमवारपासून (ता. 24) पुन्हा एकदा सुरु करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. मात्र, कोविड नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागणार आहे..
कोरोनाचा वाढता कहर व ओमायक्राॅनचे संकट, यामुळे ठाकरे सरकारने राज्यातील शाळा-महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सरकारच्या या निर्णयावर मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत होती. शिक्षणतज्ज्ञ, विद्यार्थी-पालकांसह शिक्षकांनीही याबाबत तीव्र भावना व्यक्त केल्या होत्या..
दरम्यान, राज्यातील शाळा सुरु करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापुढे प्रस्ताव ठेवला होता. मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्या प्रस्तावास आज (ता. 20) मान्यता दिली. त्यानुसार, येत्या सोमवारपासून (ता. 24) राज्यातील शाळा पुन्हा एकदा सुरु होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
शिक्षणमंत्री गायकवाड काय म्हणाल्या..?
प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री गायकवाड म्हणाल्या, की “येत्या सोमवारपासून राज्यातील शाळा सुरू केल्या जाणार आहेत. जिथे रुग्णसंख्या कमी असेल, तेथील शाळा सुरू होतील. पहिली ते बारावीचे सर्व वर्ग सुरू होणार असून, शाळांबाबतचा निर्णय स्थानिक प्रशासनावर सोपविला आहे…”
पालकांची समंती मिळालेल्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. स्थानिक परिस्थितीनुसार बालवाडी ते महाविद्यालय असे संपूर्ण शिक्षण सुरू केले जाणार असल्याचेही मंत्री गायकवाड यांनी स्पष्ट केले.
शाळा-महाविद्यालय सुरू करताना स्थानिक कोरोनाची परिस्थिती, विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून स्थानिक प्रशासनाला निर्णय घ्यावा लागणार आहे. जिल्हाधिकारी किंवा पालिका आयुक्तांवर त्याची मुख्य जबाबदारी असेल, असे त्या म्हणाल्या.
दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये शाळा-महाविद्यालये सुरु केली होती. मात्र, नंतर ओमायक्रॉन विषाणूचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. फक्त दहावी-बारावीचे वर्ग सुरू ठेवण्यास परवानगी दिली होती.
विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान व कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाल्याने शाळा सुरू करण्याची मागणी होत होती. अखेर मुख्यमंत्र्यांनी प्रस्ताव मंजूर केल्याने येत्या सोमवारपासून पुन्हा एकदा शाळांची घंटा वाजणार आहे. विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतल्याचे गायकवाड यांनी सांगितले..