पुण्यातील एका चिमुरड्याच्या अपहरणाच्या घटनेने जनमन हळहळले होते. अखेर हा चिमुकला सुखरुप पोलिसांना मिळाला नि सगळ्यांनीच सुटकेचा नि:श्वास टाकला.. डुग्गू उर्फ स्वर्णव चव्हाण, असे या चिमुकल्याचे नाव..
अवघ्या चार वर्षांच्या डुग्गूचे पुण्यातील बाणेर परिसरातून 11 जानेवारी रोजी सकाळी अज्ञात दुचाकीस्वाराने अपहरण केले होते. त्याच्या शोधासाठी पुणे पोलिसांचे 300 जणांची टीम कामाला लागली होती. अगदी कानाकोपऱ्याची झाडाझडती घेतली जात होती.
डुग्गूचे वडील डॉ. सतीश चव्हाण यांना अपहरणानंतर खंडणीसाठी कोणताही फोन आला नव्हता.. त्यामुळे त्याचे अपहरण कोणी व कशासाठी केले, असा सवाल पोलिसांसमोर उपस्थित होत होता.
पुण्यातीलच पुनावळे परिसरात गेल्या 8 दिवसांपासून डुग्गूला ठेवण्यात आले होते. पुनावळे येथील पाण्याच्या टाकीसमोर एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. तेथे दादाराव हे सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. बुधवारी (ता. 19) दुपारी एक जण चेहरा झाकून तेथे आला व लहान मुलाला दादाराव यांच्याकडे सोपवले..
‘मुलाला तुमच्याजवळ ठेवा, 10 मिनिटांत येतो..’ असे सांगून तो निघून गेला. नंतर बराच वेळ वाट पाहूनही तो परत आला नाही. काही वेळाने तो मुलगा रडायला लागला असता, इमारतीत लिफ्टचे काम करणाऱ्या तरुणांनी त्याची बॅग पाहिली. त्यावर एक मोबाइल नंबर लिहिलेला होता. त्या नंबरवर फोन केल्यानंतर डॉ. चव्हाण यांचा मुलगा डुग्गू असल्याचे लक्षात आले.
डाॅ. चव्हाण व पोलिसांनी तातडीने तेथे जाऊन डुग्गूला ताब्यात घेतले..साऱ्या घरात आनंद साजरा झाला. पोलिसांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र, हा आनंद फार काळ टिकला नाही. त्यानंतर काही वेळातच डाॅ. चव्हाण कुटुंबावर पुन्हा एकदा दु:खाचा डोंगर कोसळला..
कुटुंबावर पुन्हा दु:खाचा डोंगर
स्वर्णव उर्फ डुग्गू सुखरूप घरी पोचल्याची आनंदाची बातमी नांदेडमधील त्याची आत्या सुनीता संतोष राठोड (वय 36) यांना समजली. आपल्या लाडक्या भाच्याला भेटण्यासाठी त्या रात्रीच नांदेडहून निघाल्या.
नांदेडहून नगरमार्गे पुण्याकडे येताना, त्यांचा कारला मोठा अपघात झाला. त्यात सुनीता राठोड यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात त्यांची दोन मुले समर राठोड (वय 14) व अमन राठोड (वय 6) गंभीर जखमी झाले आहेत. तसेच सुनीता यांचे पती संतोष राठोड यांनाही किरकोळ दुखापत झाली आहे.
पुण्यातील बाणेर येथील खासगी रुग्णालयात दोन्ही लहान मुलांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे राठोड व चव्हाण कुटुंबासह परिसरावर पुन्हा एकदा शोककळा पसरली असून, नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. डुग्गू सापडल्याचा आनंद औट घटकेचा ठरला..!