कोरोनाचा वाढता संसर्ग, तसेच ओमायक्राॅनचा धोका लक्षात घेऊन ठाकरे सरकारने राज्यातील शाळा 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सरसकट शाळा बंद करण्याच्या सरकारच्या या निर्णयाबाबत विद्यार्थी-पालकांसह शिक्षकांनीही मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली होती.
सरसकट शाळा बंद करण्यापेक्षा नियोजन करून शाळा पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी शिक्षकांकडून होत होती. त्यामुळे शाळा सुरु करण्याबाबत सरकारच्या निर्णयाकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. या पार्श्वभूमीवर राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्वाचे संकेत दिले आहेत..
वर्षा गायकवाड काय म्हणाल्या..?
माध्यमांशी बोलताना मंत्री गायकवाड म्हणाल्या, की “मधल्या काळात कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने शाळा-महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता.. त्यानंतर शिक्षणतज्ज्ञ, पालक संघटना यांच्याशी अनेकदा चर्चा झाली. आम्हाला अनेक पत्रे, निवदेने आली. शाळा सुरु व्हायला हव्यात, असे अनेकांचे म्हणणं आहे.”
“अनेक तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर, जेथे कोरोना रुग्णसंख्या कमी असेल, तिथे शाळा सुरु करण्याचा अधिकार स्थानिक पातळीवर देण्याचा मुद्दा समोर आला आहे. तसा प्रस्ताव आम्ही मुख्यमंत्र्यांकडे सादर केलाय. येत्या सोमवारपासून (ता. 24 जानेवारी) शाळा सुरु करण्याचा विचार व्हावा, असे प्रस्तावात नमूद केलं आहे..”
अर्थात स्थानिक पातळीवर आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुनच शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला जावा. आम्ही मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवला असून, त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा असल्याचे गायकवाड म्हणाल्या.
प्रस्तावात नेमकं काय..?
गायकवाड म्हणाल्या, की “प्री-प्रायमरी आणि पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळा त्या त्या भागातील कोविड परिस्थिती पाहून सुरु कराव्यात. रुग्णसंख्या कमी असणाऱ्या ठिकाणी नियमांचे पालन करुन शाळा सुरु करण्यात येतील. रोज किती विद्यार्थ्यांना शाळेत बोलवायचं, याचे नियोजनही शाळांनी करावं.. विद्यार्थ्यांना दिवसाआड बोलवावं, त्यासाठी पालकांची संमती असावी.”
सरकारचा मोठा भर 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणावर आहे. शालेय स्तरावरच लसीकरणाची विनंती केली आहे. शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लसीचे दोन्ही डोस घ्यावेत. मुख्यमंत्र्यांकडून निर्णय आला की राज्यातील शाळा पुन्हा सुरु केल्या जातील. रात्रशाळांबाबतही निर्णय घेऊ, असे मंत्री गायकवाड यांनी स्पष्ट केले..