सोलापूरमधील बार्शी येथील फटे स्कॅमची गेल्या काही दिवसांपासून राज्यभर चर्चा सुरु आहे. मात्र, आता या प्रकरणाला नवे वळण लागले आहे. या स्कॅमबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. खुद्द आरोपी विशाल फटे (vishal fate) याचा एक व्हिडीओ समोर आला असून, त्यात त्याने अनेक गोष्टींबाबत खुलासा केला आहे..
सोलापूर, बार्शीसह राज्यातील अनेकांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावून आरोप फटे सध्या फरार झाला आहे. पोलिस त्याचा सगळीकडे शोध घेत असतानाच, मुख्य आरोपी विशाल फटे याने एक व्हिडीओ शेअर स्वत:ची बाजू मांडली आहे. स्वतःच्या यू-ट्युब चॅनेलवरून आरोपी फटे याने 27 मिनिटे 37 सेकंदाचा व्हिडीओ अपलोड केला आहे.
मुख्य आरोपीने काय म्हटलंय..?
या व्हिडीओमध्ये आरोपी फटे म्हणतो, की “माझा लोकांना फसवण्याचा कोणताही हेतू नव्हता. काही चुका झाल्या, त्यामुळे पैसे अडकले. आता मला माझ्या चुका मान्य असून, मी शिक्षा भोगायला तयार आहे. मी स्वत:हून पोलिसांत हजर होणार आहे. अनेक जण 200 कोटींचा घोटाळा केल्याचे बोलत आहेत, मात्र जास्तीत जास्त 10 कोटी रुपये मला लोकांचे द्यायचे आहेत..!”
“इज्जतीला घाबरुन मी सगळ्या गोष्टी मॅनेज करण्याचा प्रयत्न करतोय. दीपक अंबारे (फिर्यादी) याने माझ्याविरोधात केस केली. त्याने मला विचारायला हवं होतं. त्याच्याकडे जमीन, गाड्या, सोनं झालं. मी सहा महिन्यांच्या वर कुणाचेही पैसे ठेवले नाहीत. माझ्याविरुद्ध पुरावे नसताना त्याने आरोप केले..”
“मला कुणाचे पैसे बुडवायचे नव्हते नि नाही. दोन दिवसांत मी साऱ्या गोष्टी मॅनेज केल्या असत्या, पण अचानक केसेस पडू लागल्या. ज्यांच्याकडून पैसे येणं अपेक्षित होतं, ते आले नाहीत. सगळ्या वाईट गोष्टींची चेन सुरु झाली. आता माझ्या आवाक्याबाहेर गोष्ट गेलीय. लोकांनी मला वेळ दिला नाही. आता त्यांनी वेळ द्यावा, अशी अपेक्षाही नाही..” असे आरोपी फटे याने व्हिडीओत म्हटले आहे.
“लोकांना माझ्यावर विश्वास असेल, तर त्यांनी वाट पाहावी. ज्यांना माझ्यावर केस टाकायच्या आहेत, त्यांनी बिनधास्त करा. मला फाशीची शिक्षा झाली, तरी मी ती स्वीकारायला तयार आहे. मला पळून जायचं नव्हतं नि मी पळून जाणार नाही. संध्याकाळपर्यंत मी माझ्या जवळच्या पोलिस स्टेशनला हजर होणार आहे..” असं फटे यानं म्हटलंय.
कुटुंबाचा समावेश नाही..
माझ्या कुटुंबाचं याच्याशी काहीही देणघेणं नाही. तुम्हाला शेअर मार्केटची जेवढी माहिती आहे, त्यांनाही तेवढीच माहिती आहे. आपला मुलगा काय करतोय, हेही त्यांना माहिती नव्हतं. चुकी नसताना त्यांनी म्हातारपणातील दिवस उगाच जेलमध्ये घालवण्यात अर्थ नाही. त्यामुळं गुंतवणूकदारांनी याचा विचार करावा, असं आवाहन फटे याने केलंय..