स्टेट बॅंक ऑफ इंडिया.. अर्थात ‘एसबीआय’च्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ‘एसबीआय’ने ‘फिक्स्ड डिपॉझिट’ (FD)वरील व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ग्राहकांनी सुरक्षित गुंतवणुकीची हमी व सोबत कमाईचीही संधी मिळणार आहे. बॅंकेच्या या निर्णयाबद्दल ग्राहकांमधून समाधान व्यक्त होत आहे..
मागील काही दिवसांत अनेक बॅंकांनी ‘एफडी’वरील व्याजदरात घट केली होती. त्यामुळे बॅंकात होणाऱ्या गुंतवणुकीला फटका बसला होता. ग्राहकांनी अन्य पर्याय शोधायला सुरुवात केली होती. ग्राहकांनी पाठ फिरवल्याने पुन्हा एकदा बॅंकांनी आपल्या व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
काही दिवसांपूर्वीच खासगी क्षेत्रातील दिग्गज बँक असणाऱ्या एचडीएफसी (HDFC) बँकेनेही त्यांच्या ‘एफडी’वरील व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता ‘एसबीआय’नेही व्याजदरात वाढ केल्याने ग्राहकांचा चांगला फायदा होणार आहे.
व्याजदरात किती वाढ झाली..?
‘एसबीआय’ बँकेने एक वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक ते दोन वर्षांपर्यंतच्या ‘एफडी’वरील व्याजदरात वाढ केली आहे. या काळासाठी केल्या जाणाऱ्या ‘एफडी’वर आता 10 बेसिस पॉइंट्सनी अर्थात 0.10 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार या काळासाठी गुंतवणूक केल्यास ग्राहकांना त्याच्या ‘एफडी’वर मॅच्युरिटीनंतर आता 5 टक्क्यांऐवजी 5.1 टक्क्यांनी व्याज मिळणार असल्याचे ‘एसबीआय’च्या वेबसाइटवर नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, एसबीआयचे हे नवीन व्याजदर 15 जानेवारी 2022 (शनिवार) पासून लागू झाले आहेत. व्याजाचे हे दर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी ‘एफडी’साठी आहेत. शिवाय ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या ‘एफडी’वरील व्याजदरातही वाढ झालीय. आता एक वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक ते दोन वर्षापर्यंत मॅच्युअर होणाऱ्या ‘एफडी’वर ज्येष्ठांना 5.5 टक्क्यांऐवजी 5.6 टक्क्यांनी व्याज मिळणार आहे. अन्य कोणत्याही कालावधीसाठी ‘एफडी’च्या व्याजदरात बँकेने बदल केलेला नाही.