SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘एमपीएससी’ परीक्षेबाबत मोठी बातमी, ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया स्थगीत..!

‘एमपीएससी’ परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) काही दिवसांपूर्वीच विविध पदांसाठी नोकर भरतीची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार होते. मात्र, आता या प्रक्रियेला खिळ बसली आहे.

‘एमपीएससी’च्या संकेतस्थळावर परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करताना विद्यार्थ्यांना अडचणी येत होत्या. अनेक उमेदवारांना अर्ज भरताच येत नव्हते. याबाबत विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्याची दखल घेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

ट्विटमध्ये काय म्हटलंय..?
याबाबत आयोगाने ट्विटरवर माहिती दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये आयोगाने म्हटलंय, की ‘प्रसिद्ध सर्व जाहिरातीस अनुसरून अर्ज भरण्याची प्रक्रिया स्थगित करण्यात येत आहे. तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतर पुन्हा सूचना देण्यात येईल. तसेच सर्व जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यास पुरेशी मुदत देण्यात येईल.’

Advertisement

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नुकतीच सहायक लोक अभियोजक, गट ‘अ’ वर्गातील पदांसाठी तब्बल 547 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत होती. त्यासाठी 7 जानेवारी 2022 पासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यास सुरुवात झाली होती. तसेच हे अर्ज भरण्यासाठी 27 जानेवारीपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती.

अर्ज भरण्यास मुदतवाढ मिळणार
दरम्यान, आता तांत्रिक अडचणीमुळे ऑनलाईन अर्ज भरता येत नसल्याने विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे. तसे संकेतही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिल्याने विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Advertisement

तांत्रिक अडचण लवकर दूर करुन तातडीने ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा सुरु करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. आता ही सेवा कधी सुरु होते, याकडे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement