SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यवधीचा गंडा.., डाॅक्टर, पोलिस नि पत्रकारही फसले…!

सध्या महाराष्ट्रात एका मोठ्या घोटाळ्याची जोरदार चर्चा आहे. ते म्हणजे, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील स्कॅम.. विशाल फटे नामक आरोपीने शेअर मार्केटच्या नावाखाली भल्याभल्यांना लाखो रुपयांचा गंडा घातलाय.. विशेष म्हणजे, त्यात राजकारणी, डॉक्टर्स, प्रशासकीय अधिकारी, उद्योजक इतकेच काय, तर अगदी पोलिस नि पत्रकारांचाही समावेश आहे..

सध्या बार्शीतील चौका-चौकात, चहाच्या टपरीवर, दुकांनामध्ये एकच चर्चा रंगलीय, ती म्हणजे कोणाचे किती बुडाले..? आरोपी फटे याच्या गळाला मोठमोठे मासे लागले असले, तरी इज्जतीपोटी अनेक जण तक्रार द्यायलाही पुढे येण्यास तयार नाहीत..

Advertisement

दुसरे महत्वाचे म्हणजे, गुंतवणुकदारांनी कोणत्याही मार्गाने पैसे दिले, तरी विशाल फटे ते स्वीकारीत असे. काहींनी वेगवेगळ्या मार्गांनी ‘काळे धन’ जमा केले नि ते दामदुप्पट करण्यासाठी विशालकडे दिले. हा आकडा काही कोटींच्या घरात असल्याचे समजते. आता ‘हपापाचा माल गपापा’ झालाय.. पैसे तर गेले, चौकशीचा ससेमिरा टाळण्यासाठीही काही पुढे येत नाहीत..

नेमकं प्रकरण काय..?
विशाल फटे हा मूळचा मंगळवेढा तालुक्याचा.. त्याचे वडील बार्शीतील एका महाविद्यालयात प्राध्यापक होते. त्यामुळे अनेक वर्षांपासून त्याचे कुटुंब बार्शीतच राहते. बार्शीतील शिवाजी महाविद्यालयासमोर तो ‘साई नेट कॅफे’ चालवत होता. इथेच तो शेअर मार्केटमध्ये छोटी-छोटी गुंतवणूक करीत होता.

Advertisement

शेअर बाजारात गेल्या 10 ते 15 वर्षांपासून आपण ट्रेडिंग करीत असल्याचे तो लोकांना सांगायचा. तसेच अलका शेअर सर्व्हिसेसचा संस्थापक, विशालका कन्सल्टंट सर्व्हिसेसचा संचालक, फोग्स ट्रेडिंग कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक, एनएसई (NSE) व बीएसई (BSE) चा सदस्य असल्याचेही ते सांगत असे.

ॲल्गो ट्रेडिंगच्या नावाखाली ‘ॲटो ट्रेड’ करून मोठ्या प्रमाणात रिटर्न मिळवून देण्याचे आमिष त्याने लोकांना दाखवले. त्याने ‘विशालका’ या वेबसाइटचे एक ॲप तयार केले होते. त्यावरुन तो ग्राहकांना टिप्स द्यायचा. कृत्रिमरीत्या या ॲपवर ट्रेडींगच्या एंट्री दाखवायचा व आज किती प्रॉफिट झाला, हे दाखवून लोकांना पैसेही देत होता. प्रत्यक्षात मात्र अशा प्रकारे तो कुठलेच ट्रेडिंग करीत नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

Advertisement

सुरुवातीला त्याने कंपनीच्या नावाखाली लोकांकडून लाखो रुपये घेतले नि त्यांना मोठा परतावा देऊन लोकांचा विश्वास संपादन केला. नंतर तीन महिन्यांत दामदुप्पट पैसे देण्याचे आमिष त्याने दाखवले. आधी चांगला परतावा मिळालेला असल्याने अनेकांनी मोठ्या विश्वासाने कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली नि एक दिवस फटे याचा मोबाईल बंद झाला.

2019 पासून बार्शीत तो हा धंदा करीत होता. त्यातील काहींना त्याने 28 टक्के परतावा दिला. विशेष म्हणजे, 27 नोव्हेंबर 2021 रोजी केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते त्याला एका वाहिनीचा पुरस्कार देण्यात आला होता. त्यामुळे अनेकांचा त्याच्यावर विश्वास बसला. मात्र, 9 जानेवारीपासून त्याचा फोन बंद असून, बार्शीतून तो गायब झाला आहे.

Advertisement

पोलिसांत गुन्हा दाखल
अखेर याप्रकरणात दीपक बाबासाहेब अंधारे यांनी बार्शी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार, 2019 मध्ये पीकविम्याचे फॉर्म भरण्यासाठी गेलेले असताना, फिर्यादी दीपक आंबरे यांची विशालसोबत त्याच्या नेट कॅफेमध्ये ओळख झाली. नंतर त्यांची मैत्री अधिक घट्ट होत गेली. मात्र, त्याने 5 कोटी 63लाख 25 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे..

आंबरे यांच्या फिर्यादीवरुन विशाल अंबादास फटे, राधिका विशाल फटे, अंबादास गणपती फटे, वैभव अंबादास फटे, अलका अंबादास फटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी वडील अंबादास फटे, भाऊ वैभव फटे यांना सांगोला येथून अटक केली असून, त्यांना बार्शी न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Advertisement

बार्शी तालुक्यात फसवणुकीचा आकडा 200 कोटींवर असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी विशाल फटे याचा पासपोर्ट ‘ब्लॉक’ केला आहे. त्यामुळे तो परदेशात गेला नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे, तर काही जणांनी तो समुद्रमार्गे दुबईला निघुन गेल्याचे सांगितले आहे.

 

Advertisement