भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील टीम इंडियाचा मानहानीकारक पराभव झाल्यानंतर कॅप्टन विराट कोहलीने मोठा निर्णय घेतला आहे. त्याने थेट कसोटी संघाचेही नेतृत्व सोडले आहे. विराटने आपल्या कॅप्टन पदाचा राजीनामा दिला आहे.
विराटने याआधी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी भारताच्या टी-20 संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्याची वन-डे संघाच्या कर्णधारपदावरुनही उचलबांगडी करण्यात आली. त्यानंतर तो फक्त टेस्ट टीमचाच कॅप्टन राहिला हाेता. त्यावरुन ‘बीसीसीआय’चे अध्यक्ष सौरभ गांगुली व विराटमधील वादही चव्हाट्यावर आला होता.
मात्र, किमान काही दिवस तरी तो कसोटी संघाच्या नेतृत्व सांभाळेल, अशी चर्चा होती. मात्र, आता अचानक त्याने कसोटी संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे यापुढे तो टीम इंडियात फक्त फलंदाज म्हणूनच खेळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विराटच्या या निर्णयामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
Advertisement— Virat Kohli (@imVkohli) January 15, 2022
याबाबत विराटने ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यात तो म्हणतो, की “गेली 7 वर्षे भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद भूषविणे खूप छान होते. मी माझे काम प्रामाणिकपणे केले. कोणतीही कसर सोडली नाही. संघाला योग्य दिशेने नेण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक प्रवासाचा शेवट असतो, माझ्यासाठी कसोटी कर्णधारपद संपवण्याची हीच योग्य वेळ आहे.”
“या प्रवासात अनेक चढ-उतार आले, पण प्रयत्नात कोणतीही कसर सोडली नाही. मी नेहमीच माझे 120 टक्के योगदान देण्याचा प्रयत्न केला. जर मी काही करू शकत नसेन, तर ती गोष्ट माझ्यासाठी योग्य नाही, असे मला वाटते,” असे म्हणून विराटने ‘बीसीसीआय’, माजी कोच रवी शास्त्री, सपोर्ट स्टाफ, तसेच माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी याचे खास आभार मानले आहेत.
‘विराट’ कामगिरी
धोनीने कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर 2014 मध्ये विराट कोहलीला कसोटीचे कर्णधारपद मिळाले होते. विराट हा भारताचा सर्वाधिक यशस्वी कसोटी कर्णधार आहे. त्याने 68 कसोटीत भारताचे नेतृत्व केले. त्यात 40 सामन्यांमध्ये संघाला विजय, तर 17 सामन्यांमध्ये पराभव झाला. त्याच्यानंतर धोनी असून, धोनीने 60 कसोटी सामन्यांमध्ये नेतृत्व करताना 27 सामने जिंकले आहेत.
पहिल्याच ‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप’च्या अंतिम फेरीपर्यंत विराटच्या नेतृत्वाखाली ‘टीम इंडिया’ गेली होती. मात्र, अंतिम सामन्यात न्युझीलंडने टीम इंडियाचे ‘वर्ल्ड चॅम्पियन’ होण्याचे स्वप्न मोडलं होतं..
पुढचा कर्णधार कोण..?
विराटच्या राजीनाम्यामुळे आता टेस्ट टीमचे नेतृत्व कोणाकडे दिले जाणार, याबाबत चर्चा सुरु झाली आहे. टी-20 व वन-डेमध्ये राेहित शर्मा हाच टीम इंडियाचा कर्णधार आहे, तर टेस्टमध्ये अजिंक्य रहाणे याच्याऐवजी रोहितची उपकर्णधारपदी निवड झाली होती. मात्र, ऐनवेळी रोहितला दुखापत झाल्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत के.एल. राहुलकडे उपकर्णधारपद आले.
आता विराटच्या जागी रोहित शर्मा याचीच टेस्ट टीमच्या कर्णधारपदी निवड होणार असल्याची शक्यता आहे. विराट कोहली आता क्रिकेटमध्ये फक्त फलंदाज म्हणूनच खेळणार असल्याने ‘विराट पर्वा’चा अस्त झाल्याचे बोलले जात आहे.