गेल्या दोन वर्षांपासून जगभर कोरोनाचा कहर सुरु आहे. सातत्याने नवनव्या रुपात (व्हेरियंट) कोरोना समोर उभा राहतोय. त्यामुळे त्याला रोखण्यात अडचणी येत आहेत. जगभरातील शास्रज्ञ कोरोनाचा समूळ नायनाट करण्यासाठी दिवस-रात्र संशोधनात गुंतले आहेत. त्यातून रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत.
कोरोना विषाणू हवेत किती वेळ राहू शकतो, असा संशोधकांसह नागरिकांना प्रश्न पडला होता. इंग्लडमधील ब्रिस्टल विद्यापीठातील एरोसोल रिसर्च सेंटरच्या संशोधकांना या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. त्यांच्या नवीन संशोधनात असे आढळले, की श्वास सोडल्यानंतर हवेच्या संपर्कात येताच कोरोना विषाणूचा प्रभाव कमीकमी होत जातो.
सोशल डिस्टन्स, मास्कला महत्व
ब्रिस्टल विद्यापीठातील संशोधकांना असेही आढळून आले, की कोरोना विषाणू हवेत प्रवेश करताच, 20 मिनिटांत त्याची 90 टक्के संसर्गजन्य क्षमता गमावतो. त्यातील बहुतांश क्षमता पहिल्या 5 मिनिटांत संपते. या अभ्यासातून कोरोना विषाणू हवेत कसे वागतात, हे समोर आले असून, त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग नि मास्कचे महत्व अधोरेखित झाले आहे.
कोरोना विषाणू हवेत जास्त वेळ राहत नाही. हा विषाणू फक्त कमी अंतरावरच पसरत असल्याने कोरोनाला रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग व मास्क खूप महत्त्वाचे असल्याचे अभ्यासातून समोर आलेय. कोरोनाच्या फक्त पहिल्या तीन व्हेरिएंन्टवरत संशोधकांनी लक्ष दिलं आहे. ओमायक्राॅनचा त्यात अभ्यास केलेला नाही.
अभ्यासातून हे आले समोर..
कार्बन डायऑक्साइड-समृद्ध नि फुफ्फुसातील ओलसर जागा सोडताच, कोरोना विषाणू वेगाने कोरडे होऊ लागतात. त्यामुळे तो इतर लोकांना संक्रमित करण्यात अपयशी ठरतात. हवेतील आर्द्रता हे ठरवते की, विषाणूची लक्षणे किती वेगाने निष्क्रिय होतात.
हवेतील आर्द्रता किंवा आर्द्रता पातळी 50 टक्क्यांपेक्षा कमी (जी सामान्यत: कोरड्या ऑफिसच्या वातावरणात आढळते) असल्यास व्हायरस केवळ 5 सेकंदात आपली संसर्गजन्य क्षमता गमावतो. हवेच्या तापमानाचा विषाणूच्या संसर्गावर काहीही परिणाम होत नसल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे.