SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आता मंत्र्यांच्या बंगल्यांना गड-किल्ल्यांची नावे, कोणत्या नेत्यांच्या बंगल्याला कोणते नाव..?

“पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आता ‘रायगडा’वर मुक्कामी असतील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड शिवगडावर, तर वैद्यकिय शिक्षणमंत्री अमित देशमुख हे आता ‘जंजिरा’मध्ये निवास करणार आहेत….!”

वाचून धक्का बसला ना.. पण हे खरंय.. महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या निवासस्थानाबाबत ठाकरे सरकारने आगळा-वेगळा निर्णय घेतला आहे.. राज्यातील दुकानांवरील पाट्या मराठीतच असाव्यात, असा निर्णय घेतल्यानंतर ठाकरे सरकारने आणखी एक मोठं पाऊल उचललंय. त्यानुसार, महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांच्या बंगल्यांची नावे बदलण्यात येणार आहेत..

Advertisement

महाराष्ट्राच्या जाज्वल्ल्य इतिहासाचे साक्षीदार असणाऱ्या राज्यातील गड-किल्ल्यांच्या ऐतिहासिक वारशाचे जतन व्हावे, त्यांची महती लोकांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने ठाकरे सरकारने मंत्र्यांच्या बंगल्यांना गड-किल्ल्यांची नावे देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाने जारी केला आहे.

राज्यभरातील शिवप्रेमींनी यासाठी सतत पाठपुरवठा केला. यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे प्रस्ताव दिला होता. उदय सामंत यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. नंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंजुरीनंतर अखेर मंत्र्यांच्या शासकिय निवासस्थानांचे नामांतर करण्यात आलं आहे.

Advertisement

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांचे नामांतर करण्यात आले आहे. त्यानुसार आदित्य ठाकरे यांच्या शासकीय बंगल्याला ‘रायगड’, तर जितेंद्र आव्हाड यांचा बंगला ‘शिवगड’, तसेच अमित देशमुख यांचा बंगला आता ‘जंजिरा’ या नावाने ओळखला जाणार आहे.

या नावाने ओळखला जाणार मंत्र्यांच्या बंगला
– आदित्य ठाकरे- रायगड
– जितेंद्र आव्हाड- शिवगड
– विजय वडेट्टीवार- सिंहगड
– वर्षा गायकवाड- पावनगड
– उदय सामंत – रत्नसिंधू
– के.सी. पाडवी- प्रतापगड
– अमित देशमुख- जंजिरा
– हसन मुश्रीफ- विजयदुर्ग
– दादा भुसे- राजगड

Advertisement

उदय सामंत काय म्हणाले..?
“मंत्रालयासमोरील मंत्र्यांच्या बंगल्यांना गड-किल्ल्यांची नावे देण्यासाठी शिवप्रेमी संघटना व शिवप्रेमी प्रयत्न करीत होते. त्यानुसार, आता सर्व मंत्र्यांचे बंगले हे गड-किल्ल्यांच्या नावांनी ओळखले जाणार आहेत. बंगल्यांच्या नामांतराचा निर्णय घेतल्याबद्दल सरकारचं अभिनंदन..!”

‘वर्षा’चं काय होणार..?
दरम्यान, ठाकरे सरकारने सगळ्या मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानांचे नामांतर केले असले, तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्याचंही नाव बदलणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, नामांतर केलेल्या बंगल्यांमध्ये मलबार हिल परिसरातील बंगल्यांचा समावेश नसल्याचे समजते. आता फक्त मंत्रालयासमोरील मंत्र्यांच्या बंगल्यांचे नामांतरण करण्यात आलंय.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement