मकर संक्रातीच्या तोंडावर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा मागील 3 महिन्यांपासून रखडलेला वाढीव 3 टक्के महागाई भत्ता (DA) मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाकरे सरकारही महागाई भत्ता देण्याबाबत सकारात्मक असल्याचे दिसते.. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून महागाई भत्ता रखडल्याने राज्य शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत होती. ठाकरे सरकारबाबत मोठा असंतोष निर्माण झाला हाेता. वाढीव महागाई भत्त्यासाठी राज्य कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला हाेता. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने सरकारने कर्मचाऱ्यांना आंदोलन करण्यास विरोध केला होता.
दरम्यान, कोरोनामुळे राज्याच्या तिजोरीत येणारा महसूल घटल्याने कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता लांबणीवर जाणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, राज्य सरकारने जानेवारी महिन्याच्या वेतन देयकासोबत राज्य कर्मचाऱ्यांचा 3 टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत वित्त विभागासोबत चर्चा झाल्याचेही सांगण्यात आले.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ
केंद्र सरकरच्या नियमाप्रमाणे 1 जुलै 2021 पासून हा वाढीव महागाई भत्ता लागू केला जाणार आहे. त्यामुळे 1 जुलै 2021 पासून डिसेंबर 2021 पर्यंत 3 टक्के महागाई भत्त्यातील फरकही दिला जाणार आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाही वाढीव महागाई भत्त्याचा लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात आले.
केंद्र सरकारनेही 1 जुलै 2019 पासून केंद्रिय कर्मचाऱ्यांचा थकित महागाई भत्ता प्रत्यक्ष अदा करण्याचं घोषीत केलं होतं. त्यामुळे केंद्रिय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याची रक्कम मूळ वेतनाच्या 17 टक्क्यांवरून 28 टक्क्यांपर्यंत वाढली होती. त्यानंतर आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्याही महागाई भत्त्यात वाढ झाली आहे.