SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

बाप रे…! वर्ध्यात रुग्णालयामागे 11 कवट्या नि 54 हाडं..! थरारक घटनेनं महाराष्ट्र हादरला..

वर्धा जिल्ह्यातून माणूसकीला काळीमा फासणारी बातमी समोर येत आहे. वर्धा येथील आर्वी शहरातील एका खासगी रुग्णालय परिसरातील गोबर गॅसच्या टाकीतून तब्बल 11 कवट्या नि 54 हाडं, असे अवशेष सापडले आहे. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी महिला डॉक्टरासह तिघांना बेड्या ठोकल्या आहेत.

हे सगळं प्रकरण एका अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व त्यातून ती मुलगी गरोदर राहिल्याने करण्यात आलेल्या गर्भपातामुळे समोर आलंय. नेमका हा काय प्रकार आहे, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

Advertisement

नेमकं काय घडलं..?
वर्धा जिल्ह्यातील आर्वी शहरातील एका 13 वर्षीय मुलीवर तिच्या घराशेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलाने अत्याचार केला. त्यातून ही अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. मुलीच्या पोटात अचानक दुखू लागल्याने, आई-वडीलांनी तिला डॉक्टरांकडे नेले. त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला.

पीडित मुलीचा गर्भपात करावा, तसेच पोलिसांत गेल्यास गावात बदनामी करण्याची धमकी अल्पवयीन आरोपी व त्याच्या आई-वडिलांनी मुलीच्या कुटुंबाला दिली. मुलीची व कुटुंबाची बदनामी टाळण्यासाठी मुलीच्या आई-वडिलांनीही आरोपींचे म्हणणे ऐकले. त्यानंतर 6 जानेवारी रोजी स्री रोगतज्ज्ञ डॉ. रेखा कदम हिच्या कदम दवाखान्यात पीडित मुलीचा बेकायदा गर्भपात करण्यात आला. हा गर्भपात करण्यासाठी आरोपीच्या घरच्यांनी डाॅ. कदम हिला 30 हजार रुपये दिले.

Advertisement

अखेर हे प्रकरण समोर आले. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर आर्वी पोलिसांनी अल्पवयीन मुलासह त्याच्या आई-वडिलांनाही ताब्यात घेतले. तसेच, सुरुवातीला डॉ. रेखा कदम, नंतर तिच्या सासू शैलजा कदम, परिचारिका संगीता काळे (वय 38) व पूनम दशरथ दाहट (वय 45) यांना अटक करण्यात आली.

कदम रुग्णालय परिसराची पोलिसांनी कसून झाडाझडती घेतली असता, रुग्णालय परिसरातील गोबर गॅसच्या टाकीतून 11 कवट्या नि 54 हाडे, असे अवशेष आढळून आले आहेत. ते पाहून पोलिसही चक्रावून गेले.

Advertisement

रुग्णालयामागे बायोगॅस प्रकल्पाचा खड्डा होता. मात्र, बऱ्याच दिवसांपासून त्याचा वापर होत नव्हता. त्यामुळे या खड्ड्यात रुग्णालयातील ‘वेस्टेज’ साहित्य टाकले जात होते. त्यातच इतर साहित्यासह या कवट्या व हाडे पोलिसांना सापडले.

पोलिसांनी पंचांसमक्ष अनेक बाबी जप्त केल्या असून, हे अवशेष ‘डीएनए’ टेस्टसाठी पाठविण्यात येणार आहे. हाडांचे अवशेष जनावरांचे की माणसांचे, याबाबतचा खुलासा अहवाल प्राप्त झाल्यावरच  समोर येणार आहे. मात्र, या रुग्णालयात याआधीही बेकायदा गर्भपात केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement

तपासासाठी विशेष पथकाची नियुक्ती
गर्भपात प्रकरणाच्या सखोल तपासासाठी पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी विशेष पथकाची नियुक्ती केली आहे. या प्रकरणात आणखी काहींना ताब्यात घेणार असल्याचे पोलिस अधीक्षक होळकर यांनी सांगितले. हे प्रकरण पुढे काय वळण घेते, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement