SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मोठी बातमी : राज्यातील दुकानांवरील पाट्या आता मराठीतच, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय..!

महाराष्ट्रातील नागरिकांसाठी मोठी बातमी आहे.. राज्यातील दुकानांवर लावण्यात येणाऱ्या पाट्या आता मराठीत, मोठ्या अक्षरात लावाव्या लागणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली आहे.

कोरोनाचा वाढता संसर्ग व ओमायक्राॅनच्या संकटामुळे मागील दोन आठवडे राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली नव्हती. अखेर या बैठकीला आज मुहूर्त मिळाला. या बैठकीत दुकानावरील पाट्या मराठीत बसविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्यासाठी राज्याचे मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी पुढाकार घेतला.

Advertisement

राज्यातील दुकानांवर मराठी पाट्या असाव्यात, असा नियम राज्य सरकारने केलेला होता. त्यासाठी ‘महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवा शर्तीचे विनियमन) अधिनियम 2017’ हा अधिनियम लागू होतो. त्यानुसार दहापेक्षा कमी कामगार असलेली दुकाने व दुकानदार या नियमातून पळवाट काढत असल्याचे आढळून आलं होतं.

Advertisement

दुकानाचे इंग्रजी वा इतर भाषेतील नाव मोठ्या अक्षरात, तर मराठी नाव छोट्या अक्षरात लिहिलं जात असल्याच्या अनेक तक्रारी राज्य सरकारकडे आल्या होत्या. तसेच याबाबत उपाययोजना करण्याचीही मागणी होत होती.

मंत्रीमंडळाची प्रस्तावाला मंजूरी
अखेर राज्य सरकारने याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यापुढे दुकानांच्या पाट्यांवर इंग्रजी अथवा इतर भाषेत जेवढ्या मोठ्या अक्षरात नाव लिहिलं जाईल, तेवढ्याच मोठ्या अक्षरात मराठीतही नाव लिहावे लागणार आहे. दुकानात एक व्यक्ती काम करीत असेल, तरी दुकानावर मराठी भाषेतील पाटीचा नियम असेल.

Advertisement

मंत्रीमंडळाच्या आजच्या बैठकीत ‘महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम, 2017’मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मोठ्या दुकानांप्रमाणेच आता छोट्या दुकानांवरील पाट्याही मराठीत कराव्या लागणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

बहुसंख्य दुकाने व व्यापारी पेढ्यांमध्ये दहांपेक्षा कमी कामगार असतात, हे लक्षात घेतल्यास यापुढे सर्वच दुकांनावरील पाट्या मराठीत दिसतील. मराठीत-देवनागरी लिपीतील अक्षरे दुसऱ्या (इंग्रजी किंवा अन्य) भाषेतील अक्षरांपेक्षा लहान ठेवता येणार नाहीत, अशीही दुरुस्ती करण्यात आली.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement