SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शेतकऱ्यांचं वीजबिल माफ होणार, थकबाकीत सवलत मिळविण्यासाठी आता ‘इतक्या’ दिवसांचीच मुदत!

राज्यातील शेतकऱ्यांना कृषिपंप वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीसाठी थकीत रकमेत 66 टक्के सवलत मिळविण्याच्या संधीचा लाभ घेण्यासाठी अजून फक्त तीन महिन्यांचाच अवधी उरला आहे. कृषिपंपाच्या वीज देयकातून 66 टक्के सवलत मिळविण्याची संधी मार्चपर्यंत उपलब्ध राहणार आहे.

सध्या चालू वर्षाच्या मार्च 2022 पर्यंत चालू वीज देयक आणि सुधारित थकबाकीमधील केवळ 50 टक्के रक्कम भरली तर शिल्लक थकबाकी माफ केली जात आहे. महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रामध्ये 6 लाख 45 हजार 812 शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतल्यामुळे त्यापैकी 1 लाख 94 हजार 381 शेतकऱ्यांनी थकबाकीमधील 66 टक्के सवलत मिळवत पूर्ण वीज देयक कोरे केले आहे.

Advertisement

राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी जाहीर केलेल्या कृषिपंप वीजजोडणी धोरणामुळे कृषिपंपांच्या नवीन वीजजोडण्या, वीज देयकातून थकबाकीमुक्ती, स्थानिक वीजयंत्रणेचे विस्तारीकरण आणि सक्षमीकरणाला अधिकचा वेग प्राप्त झाला आहे.

चालू 2022 वर्षातील व थकीत वीज देयक भरण्यामधून ग्रामपंचायती, जिल्हा क्षेत्रासाठी प्रत्येकी 33 टक्के असा एकूण 755 कोटी 88 लाख रुपयांचा आकस्मिक निधी जमा झालाय. आतापर्यंत चालू वीज देयकांसह सुधारित थकबाकी म्हटलं तर एकूण 929 कोटी 54 लाख रुपयांचा भरणा केला गेला आहे. त्यातील या सर्व शेतकऱ्यांना भरलेल्या थकबाकीएवढीच 432 कोटी 30 लाख रुपयांची माफी तसेच मूळ थकबाकीत 1671 कोटी 30 लाख रुपयांची सूट दिली आहे.

Advertisement

महावितरण सध्या आर्थिक संकटात असल्यामुळे ज्यांचा योजनेत सहभाग नाही तसेच चालू वीजबिलांचा भरणा देखील नाही, अशा कृषिपंपधारकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची सरसकट कारवाई केली जातेय. कृषिपंपाच्या मूळ थकबाकीत 66 टक्के सवलत आणि सुधारित शकबाकीतील 50 टक्के माफीच्या योजनेमध्ये राज्यात शेतकऱ्यांचा सहभाग वाढतो आहे. त्यासाठी गावोगावी शेतकऱ्यांचे मेळावेही घेतले जात आहेत.

सुधारित थकबाकीच्या रकमेत 50 टक्के माफी मिळविण्याची संधी या नवीन वर्षाच्या मार्च 2022 पर्यंत असल्याने थकबाकीदार शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे व त्यासोबतच चालू वीजबिलांचा नियमित भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून (Mahavitaran) करण्यात आले आहे.

Advertisement

राज्यात पुणे, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये वीज देयकांच्या थकबाकीमुक्ती योजनेस जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक 61 हजार 826 तर सातारा जिल्हा 60 हजार 829, पुणे जिल्हा 33 हजार 888, सांगली जिल्हा 27 हजार 750 आणि सोलापूर जिल्ह्यातील 10 हजार 88 शेतकरी वीज देयकातून थकबाकीमुक्त झाले आहेत. देयकात तक्रार किंवा शंका असल्यास त्याचे तातडीने निराकरण करण्याचे निर्देश पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/puUrE

Advertisement