देशात आजपासून कोरोनाचा ‘बुस्टर डोस’ देणार, कोणाला मिळणार बुस्टर डोस, त्यासाठीची प्रोसेस व नियमावली जाणून घ्या..!
देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. त्यात ओमायक्राॅनचे संकट उभे ठाकल्याने खबरदारीचा उपाय म्हणून ठाकरे सरकारने राज्यातील निर्बंध आणखी कडक केले आहेत. दुसरीकडे कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीमही जोरात सुरु आहेत.
लसीकरणानंतरही कोरोना रुग्ण वाढत असल्याने केंद्र सरकारने नागरिकांना बुस्टर डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, आजपासून (ता. 10) आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स, तसेच 60 वर्षांवरील नागरिकांना बूस्टर डोस (Precautionary Dose) देण्यास सुरुवात होणार आहे. त्यासाठीची पूर्ण तयारी करण्यात आली आहे.
याबाबत नॅशनल हेल्थ मिशनचे अतिरिक्त सचिव व मिशन डायरेक्टर विकास शील यांनी माहिती दिली. ते म्हणाले, की “बूस्टर डोससाठी ऑनलाइन अपॉइंटमेंन्टची सुविधा ‘कोविन’ (coWIN) अॅपवर देण्यात आलीय. देशात आजपासून (10 जानेवारी) बूस्टर डोस देण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 60 वर्षांवरील कमी प्रतिकारशक्ती असलेल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी कोरोनाची तिसरी लस, अर्थात बूस्टर डोस देण्याची घोषणा केली होती. तसेच आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाइन वर्कर्स यांनाही बूस्टर डोस देणार असल्याचे सांगितले होते.
दरम्यान, नागरिकांना बूस्टर डोस घेण्यासाठी नव्याने नोंदणी करण्याची गरज नाही. ज्यांनी कोविड लसीचे दोन डोस घेतलेले आहेत, ते कोणत्याही लसीकरण केंद्रात जाऊन थेट लस घेऊ शकतात किंवा वॉक-इन लसही घेऊ शकतात. तसेच याआधी ज्या कंपनीचे डोस घेतलेले असतील, त्याच लसीचा डोस दिला जाणार असल्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.
कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले असल्यास, नवीन नोंदणीची गरज नाही. केवळ लसीकरण केंद्रात ‘अपॉइंटमेंट’ घ्यावी लागणार आहे. मात्र, कोणत्याही कारणास्तव अपॉइंटमेंट घेणे शक्य नसल्यास, थेट लसीकरण केंद्रात लस घेता येणार आहे.
बुस्टर डोससाठी नियमावली
– कॉमोरबिडीटी (Comorbidity) असल्याचे दाखविण्यासाठी डॉक्टरांचे प्रमाणपत्र, प्रिस्क्रिप्शनची गरज नाही.. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बुस्टर डोस घेण्यात यावा.
– ज्यांनी दुसरा डोस घेऊन 9 महिने झाले असतील, अशांनाच ‘बुस्टर डोस’ दिला जाणार आहे.
– बूस्टर डोससाठी ऑनलाइन आणि थेट लसीकरण केंद्रावर नोंदणी करता येणार.
– बूस्टर डोस घेतल्यानंतर लाभार्थ्यांच्या लस प्रमाणपत्रावर त्याचा तसा स्पष्ट उल्लेख असेल.