प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. एका महिलेचे केस कापताना जावेद हबीब तिच्या डोक्यावर थुंकला होता. हा प्रकार सोशल मीडियातून समोर आल्यावर जावेद हबीब याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. विशेषत: महिलांनी या प्रकाराबाबत तिव्र संताप व्यक्त केला..
पीडित महिलेने पोलिसांत गुन्हा दाखल केल्यावर अखेर जावेद हबीब याला उपरती झाली. आता या सगळ्या प्रकाराबाबत जावेद हबीब याने एक व्हिडिओ शेअर केला असून, झाल्या प्रकाराबाबत माफी मागितली आहे.. मात्र, त्यानंतरही हे प्रकरण शांत होताना दिसत नाही.
AdvertisementView this post on InstagramAdvertisement
नेमकं काय घडलं..? मुझफ्फरनगरमधील जदौदा येथील हॉटेलमध्ये 3 जानेवारी रोजी जावेद हबीब याची कार्यशाळा झाली. त्यात त्याने उपस्थित लोकांना हेअर स्टाइलबाबत टिप्स दिल्या. ‘पाणी नसल्यास थुंकीने केस कापता येतात…’ असे बोलता बोलता डेमो म्हणून त्याच्या समोर खुर्चीवर बसलेल्या महिलेच्या डोक्यावर थुंकून तिचे केस कापले.
दरम्यान, सोशल मीडियातून हा सगळा प्रकार 6 जानेवारी रोजी समोर आला. याबाबतचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. पूजा गुप्ता, असे या प्रकरणातील पीडित महिलेचे नाव आहे. ती मूळची बागपत जिल्ह्यातील बरौत शहरातील असून, स्वत: ब्युटी पार्लर चालवते.
हा प्रकार समोर आल्यावर जावेद हबीब याच्याविरोधात संतापाची लाट उसळली. दरम्यान, 6 जानेवारी रोजी पूजाने जावेद हबीब याच्याविरुद्ध मुझफ्फरनगरच्या मन्सूरपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर अनेक संघटनांनी हबीब याला अटक करण्याची मागणी केली आहे..
राष्ट्रीय महिला आयोगानेही या प्रकाराची दखल घेतली. याबाबत आयोगाने उत्तर प्रदेश व दिल्ली पोलिसांच्या ‘डीजीपीं’ना पत्र लिहिले आहे. आयाेगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी ट्विट करुन पोलिसांनी याप्रकरणी आवश्यक ती कारवाई करण्याची मागणी केली. महिला आयोगाच्या कठोर भूमिकेमुळे जावेद हबीब यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत.
AdvertisementView this post on Instagram
Advertisement
जावेद हबीबने काय म्हटलंय..?
आता या सगळ्या प्रकारावर जावेद हबीबने एक व्हिडिओ शेअर करीत झाल्या प्रकाराबाबत माफी मागितली आहे. त्यात त्यानं असं म्हटलंय, की “माझ्या सेमिनार दरम्यान माझ्याकडून बोलल्या गेलेल्या शब्दांवर काही लोकांनी आक्षेप घेतला. माझ्याकडून झालेल्या कृतीचा निषेध करण्यात आला. मी फक्त एकच सांगू इच्छितो, की माझे सेमिनार प्रोफेशनल वर्कशाॅप असतात. त्यात माझ्या क्षेत्राशी संबंधित लोक सहभागी होतात. या सेमिनारचा वेळही जास्त असतो. त्यामुळे सेमिनार मजेदार करण्यासाठी माझ्याकडून हा प्रकार झाला. तुम्ही खरंच माझ्याकडून दुखावला गेला असाल, तर मी अत्यंत तळमळीने सर्वांची माफी मागतो. मला क्षमा करा…!”