कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे देशभरात चिंता व्यक्त होत आहे. दुसरीकडे दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही वाढत असल्याने काळजीत भर पडली आहे. देशात गुरुवारी (ता. 6) सुमारे 90 हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून आली. त्यामुळे देशात कोरोनाची तिसरी लाट आल्याचे बोलले जात आहे..
सध्या तरी कोरोना प्रतिबंधित लसीकरण व कोविड नियमांचे पालन करण्याशिवाय पर्याय नाही. त्यातही हातांची वारंवार स्वच्छता नि मास्कचा वापर करणे गरजेचे आहे. मात्र, वारंवार आवाहन करुनही मास्क वापरण्याकडे नागरिकांचे दुर्लक्ष होताना दिसतेय..
देशात कोरोनापासून बचाव करण्यासाठी अनेक जण कापडी मास्क घालून फिरतात. मात्र, ते खरेच सुरक्षित आहेत, असा प्रश्न निर्माण होत आहे. याबाबत तज्ज्ञांनी काय म्हटलंय, हे जाणून घेऊ या..
AdvertisementView this post on InstagramAdvertisement
तज्ज्ञ काय म्हणतात..?
आरोग्यतज्ज्ञ व शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, कापडी मास्क हे ओमायक्रॉन संसर्ग टाळू शकत नाही. कापडाच्या मास्क (Mask) तुमचे नाक-तोंड सहज ड्रॉपलेट्स वाचवू शकतात, परंतु हवेतील विषाणूपासून बचाव करण्यासाठी कापडी मास्क प्रभावी नाहीत. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी हे मास्क पुरेसे सुरक्षित मानले जाऊ शकत नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
एका लेयरचा कापडी मास्क टाळून कमीत कमी दोन किंवा तीन लेयर मास्क निवडावा. ओमायक्राॅन व्हेरिएंटपासून संरक्षण करण्यासाठी सर्जिकल मास्क किंवा सिंगल-लेयर कापडी मास्क टाळावेत व अधिक प्रभावी मास्कच वापरावेत, अशी शिफारस आरोग्यतज्ज्ञांनी केली आहे.
सिंगल लेयर मास्क व्हायरस वाहून नेणाऱ्या ‘एरोसोल’च्या मोठ्या तुकड्यांना ब्लॉक करु शकतात, परंतु ओमायक्रॉनबाबत, ते ‘एरोसोल’च्या लहान तुकड्यांना ब्लॉक करण्याइतके प्रभावीपणे कार्य करीत नसल्याचे सांगण्यात आले..
असा मास्क वापरा
सिंगल लेयर कापडी मास्क न घालता, दोन किंवा तीन थर असणारे फेस मास्क वापरावेत. कापडी मास्कखाली डिस्पोजेबल मास्क घाला. कापडाचा मुखवटा देखील, असा असावा की फॅब्रिकचे अनेक स्तर असतील. पुन्हा वापरता येण्याजोगा मास्क चांगला धुवा. डिस्पोजेबल मास्क वापरल्यानंतर लगेच फेकून द्या.
एन-95 मास्क
कोरोनापासून संरक्षणासाठी N-95 मास्क उपयुक्त ठरु शकतात, कारण या मास्कमध्ये तंतूंचे दाट जाळे असते. मोठे ड्रॉपलेट्स आणि एरोसोल पकडण्यासाठी ते अत्यंत प्रभावी आहेत. तज्ज्ञही हा मास्क घालण्याची शिफारस करतात. हवेतील 95 टक्के कणांपर्यंत हे मास्क फिल्टर करतात. मात्र, श्वसनाचा त्रास असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच N-95 मास्क वापरा.
सर्जिकल मास्क
सर्जिकल मास्कमुळे श्वासाद्वारे जंतूंचा प्रवेश रोखला जाऊ शकतो. मात्र, कोरोनासारख्या विषाणूंना रोखण्यासाठी ते कितपत प्रभावी ठरतील, हे सांगता येत नाही. सर्जिकल मास्क फक्त एकदा वापरावेत, एकदा वापरल्यानंतर ते फेकून द्यावेत. डबल मास्किंग हा अधिक प्रभावी मार्ग असू शकतो. यासाठी आधी सर्जिकल मास्क आणि त्यावर कापडी मास्क घालता येईल.