SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, ओमायक्राॅनमुळे कार्यालयातील हजेरीबाबत मोठा निर्णय..!

कोरोनाच्या ओमायक्राॅन विषाणूने जगभर धुमाकूळ घातला आहे. भारतात कोरोना संसर्ग आटोक्यात आल्याचे दिसत असतानाच, पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. त्यात ओमायक्राॅन बाधित रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे..

कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे बहुतांश खासगी कंपन्यांनी ‘वर्क फ्राॅम हाेम’चा निर्णय घेतला होता. सरकारी कार्यालयांसह खासगी कंपन्यांनी त्यांच्या कार्यालयातील उपस्थिती निम्म्याने कमी केली होती. काही दिवसांपासून ओमायक्राॅनचा संसर्ग वाढत असल्याने केंद्राने सरकारी कर्मचाऱ्यांच्या कार्यालयातील उपस्थितीबाबत महत्वाचा निर्णय घेतलाय.

Advertisement

मोदी सरकारने उपसचिव दर्जापेक्षा वरच्या अधिकाऱ्यांना वगळून अन्य सर्व कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या कार्यालयातील प्रत्यक्ष उपस्थितीबाबत 50 टक्के चक्राकार पद्धतीने उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला असून, त्याची अंमलबजावणी तातडीने आजपासूनच (ता. 4) करण्याचा आदेश दिला आहे..

दिव्यांग व्यक्ती, गरोदर महिलांना सूट
केवळ उपसचिव आणि त्यावरच्या दर्जाच्या अधिकाऱ्यांनाच रोज कार्यालयात हजर राहणे बंधनकारक केले आहे. मात्र, त्यातूनही दिव्यांग व्यक्ती, गरोदर महिला अधिकाऱ्यांना वगळण्यात आले आहे. कार्यालयात एकाच वेळी गर्दी होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून वेगवेगळ्या वेळांना हजेरी लावावी लागणार आहे.

Advertisement

कंटेन्मेंट झोनमध्ये राहणाऱ्या अधिकाऱ्यांना कार्यालयात येण्यापासून वगळले आहे. कार्यालयात न येता, घरून काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेत फोन अथवा अन्य साधनांद्वारे संपर्कात राहावे लागणार आहे. कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोविड-19 नियमांचे पालन करावे लागणार आहे.

कार्यालयात सुलभ वर्तन ठेवणे, वारंवार हात धुणे, मास्क लावणे आणि सुरक्षित अंतर पाळणे, आदी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/puUrE

Advertisement