मागील पूर्ण वर्ष म्हणजेच 2021 हे साल कोरोना संकट नि वाढती महागाई, असेच राहिले.. मात्र, नव्या वर्षाची सुरुवात चांगली झालीय.. या वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोदी सरकारने गॅस ग्राहकांना दिलासा दिला आहे.
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती सतत वाढत गेल्याने गेल्या काही दिवसांत ‘एलपीजी’ गॅस सिलिंडरच्या दरात प्रचंड वाढ झाली होती. त्यामुळे घराचे बजेट कोलमडले होते. मात्र, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी ‘एलपीजी’ सिलिंडरच्या दरात मोठी कपात केली.
‘इंडियन ऑइल’ने व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात केली आहे. त्यानुसार, १९ किलोचा ‘एलपीजी’ गॅस सिलिंडर १ जानेवारी २०२२ पासून १०२ रुपयांनी स्वस्त झाला आहे. त्यामुळे इंधन दरवाढीच्या भडक्यात होरपळून निघालेल्या व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
घरगुती गॅसचे दर जैसे-थे
घरगुती वापराच्या ‘एलपीजी’ गॅस सिलिंडरच्या किमती स्थिर आहेत. विना सबसिडीच्या 14.2 किलो गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत आज 14.2 किलो सिलेंडरची किंमत 899.5 रुपये, मुंबईत 899.5 रुपये, कलकत्तामध्ये 926 रुपये, तर चेन्नईत 915.5 रुपये होती.
दरम्यान, यापूर्वी सलग दोन महिने १९ किलो व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती वाढल्या होत्या. नोव्हेंबर-2021 मध्ये तब्बल २६६ रुपयांनी, तर डिसेंबर-2021 मध्ये आणखी 103.50 रुपयांनी व्यावसायिक गॅस महागला होता. आता पुढील इंधन दर आढावा १ फेब्रुवारी २०२२ रोजी घेतला जाईल.
तुमच्या शहरातील सिलिंडरची किंमत जाणून घ्या
तुमच्या शहरातील गॅस सिलिंडरच्या (LPG Cylinder) नवीन किमती जाणून घेता येणार आहेत. सरकारी तेल कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर या किमती पाहू शकता.
- तुम्ही ‘आयओसीएल’ (IOCL)च्या cx.indianoil.in/webcenter/portal/Customer/pages_productprice जा.
- नंतर वेबसाइटवर राज्य, जिल्हा, वितरक निवडा आणि नंतर शोध पर्यायावर क्लिक करा. लगेच गॅसच्या किमती समोर येतील.