क्रिकेट रसिकांसाठी महत्वाची बातमी आहे.. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेनंतर सुरु होणाऱ्या वन-डे सिरीजसाठी अखेर शुक्रवारी (31 डिसेंबर 2021) टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, या संघात टेस्टनंतर आता वन-डे मालिकेतूनही कॅप्टन रोहित शर्मा दुखापतीमुळे बाहेर झाला आहे..
रोहित शर्मा याच्या जागी कर्णधार पदाची धुरा भारताचा स्टार बॅटसमन के. एल. राहुल याच्या खांद्यावर देण्यात आली आहे, तर या मालिकेसाठी उपकर्णधार पदी वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह याची निवड करण्यात आली आहे.
सध्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका सुरु आहे. टीम इंडियाने मोठ्या दिमाखात सेंच्युरियन येथील पहिला सामना जिंकला असून, अजून दोन टेस्ट मॅच व्हायच्या आहेत. त्यानंतर वन-डे मालिकेला सुरुवात होणार आहे..
दुखापतीमुळे रोहित शर्मा टेस्ट मालिकेला मुकला होता. मात्र, किमान तो वन-डे मालिकेत तरी खेळेल, अशी अपेक्षा त्याच्या चाहत्यांना होती. विशेष म्हणजे, कर्णधारपद स्वीकारल्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रोहित शर्मा पहिल्यांदा कर्णधार म्हणून खेळणार होता. मात्र, दुखापतीमुळे तो या मालिकेतूनही बाहेर झाला.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन-डे मालिकेसाठी रोहित शर्मा हा बंगळुरु येथील ‘एनसीए’मध्ये फिटनेसवर मेहतन घेण्यासाठी गेला होता. मात्र, अजूनही तो पूर्णपणे फिट झालेला नाही. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे तो वन-डे मालिकेलाही मुकणार आहे..
गायकवाड-अय्यरला लाॅटरी
नुकत्याच झालेल्या विजय हजारे करंडक स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या ऋतुराज गायकवाड व वेंकटेश अय्यर यांना लाॅटरी लागली आहे. या दोघांची वन-डे टीममध्ये निवड झाली आहे.. कोहली, पंत आणि बुमराह नऊ महिन्यानंतर वन-डे संघात परतले आहेत.
शमीला विश्रांती
वन-डे मालिकेतून वेगवान बाॅलर मोहम्मद शमी याला विश्रांती देण्यात आली आहे. रोहित शर्माच्या जागी ओपनिंगसाठी शिखर धवन मैदानात उतरेल. युजवेंद्र चहल व वॉशिंग्टन सुंदर यांनाही संघात जागा देण्यात आली आहे.
वन-डेसाठी असा असेल भारतीय संघ
के.एल. राहुल (कर्णधार), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, ऋषभ पंत (विकेट किपर), इशान किशन (विकेट किपर), यझुवेंद्र चहल, आर. अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज.