कोरोना संसर्ग कमी झाल्याने ठाकरे सरकारने राज्यातील निर्बंध हळुहळू हटविले होते. मात्र, त्यानंतर राज्यात कोरोनाच्या ओमायक्राॅन व्हेरियंटचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शिवाय रोजच्या कोरोनाबाधितांच्या संख्येतही मोठी वाढ होताना दिसत आहे..
राज्यात गुरुवारी (ता. 30) कोरोनाचे ५३६८ नवे रुग्ण आढळले. त्यात ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या तब्बल १९८ इतकी आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी नव्या वर्षात ठाकरे सरकार आणखी कठोर निर्बंध लागू करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली..
सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी, अर्थात ३१ डिसेंबरला मध्यरात्रीपासूनच राज्यात हे निर्बंध लागू केले जाणार आहेत. त्यामुळे नव्या वर्षाच्या स्वागत कार्यक्रमांवर विरजण पडलं असून, या निर्बंधांमुळे जाहीर कार्यक्रमांवर बंदी घालण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व नंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी (ता. 30) वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध लागू करण्याचे संकेत दिले होते. अर्थात याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच घेणार आहेत.
राज्यात कडक निर्बंध लागू करण्याबाबतची अधिकृत घोषणा पुढील २४ तासांत होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री ठाकरे उद्या (ता. 31) याबाबतचा निर्णय जाहीर करणार असल्याचे मंत्री टोपे यांनी सांगितले.
जाहीर कार्यक्रमांवर निर्बंध
राज्यात नेमके कोणते निर्बंध असतील, याबाबत माहिती मिळू शकली नाही. मात्र, सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या जाहीर कार्यक्रमांवर निर्बंध येण्याची शक्यता आहे. अशा कार्यक्रमांसाठी फक्त ५० लोकांनाच परवानगी दिली जाणार असल्याचे समजते..
राज्यात गुरुवारी ५३६८ कोरोना रुग्ण आढळले, तर बुधवारी ३९०० इतकी रुग्णसंख्या होती. मुंबईतही रुग्णसंख्येचे प्रमाण दुपटीने वाढले आहे.. मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट सर्वाधिक (८.४८ टक्के) असल्याने आरोग्यमंत्री टोपे यांनी काळजी व्यक्त केली आहे..