सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाच्या स्वागतासाठी प्रत्येक जण सज्ज झाला आहे. गेली दोन वर्षे कोरोना संकट आहे. त्यात इंधन दरवाढ, गॅस दरवाढीने महागाईचा कळस गाठलाय. किमान आगामी नवे वर्ष तरी आनंददायी ठरावे, अशीच सर्वांची इच्छा असेल..
महागाईमुळे हतबल झालेल्या नागरिकांसाठी आगामी वर्षातही दिलासा मिळण्याची चिन्हे नाहीत. कारण, नवे वर्षही खूप सारी महागाई घेऊनच येणार आहे. कोरोनामुळे आधीच नागरिक वैतागले आहेत, त्यात ‘ओमायक्रोन’ विषाणूची ‘एन्ट्री’ झालीय.
‘ओमायक्राेन’ बाधित रुग्णसंख्या वाढल्यास राज्यात पुन्हा एकदा निर्बंध लागू शकतात. त्यामुळे व्यापाऱ्यांसह नागरिकही धास्तावले आहेत. गेल्या वर्षाच्या जखमा ताज्या असतानाच, १ जानेवारीपासून सामान्यांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे.
सप्टेंबर-2021 मध्ये ‘जीएसटी’ (GST) परिषदेची बैठक झाली होती. त्यात काही वस्तूंवरील ‘जीएसटी’चा दर वाढविण्याचा निर्णय घेतला होता. हे दर नवीन वर्षापासून लागू होणार आहेत.
‘जीएसटी’ परिषदेने घेतलेल्या निर्णयानुसार, १ हजार रुपयांहून कमी किमतीच्या कपड्यांवरील ‘जीएसटी’चा दर ५ टक्क्यांवरून १२ टक्के केला आहे. चपलांसाठीही आता हाच ‘जीएसटी’ दर लागू होणार आहे. याशिवाय शिवलेल्या कपड्यांसह हातमागावर विणलेले कपडेही महाग होणार आहेत.
कपडे शिवणेही महाग होणार..
दरम्यान, केंद्र सरकारने शिलाईसाठी वापरल्या जाणाऱ्या विविध धाग्यांवरही ‘जीएसटी’ वाढविला आहे. त्यामुळे रेडिमेड कपड्यांसह आता कपडे शिवणेही महागणार आहे. त्यामुळे मध्यमवर्गीयांचे बजेट निश्चितच कोसळणार आहे..
दुसरीकडे आता हळदीच्या पिकांवरही ‘जीएसटी’ आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हळद हे पीक धान्य पिकांमध्ये मोडत नसल्याचे त्यासाठी सांगितले जाते. त्यामुळे आता हळदीसाठीही जादा पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे..