SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ब्रेकिंग : ‘एमपीएससी’च्या परीक्षा पुन्हा पुढे ढकलल्या, आता कधी होणार या परीक्षा, वाचा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांसाठी मोठी बातमी आहे.. येत्या 2 जानेवारी 2022 रोजी होणारी ‘एमपीएससी’ची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. लवकरच परीक्षेची नवी तारीख जाहीर केली जाणार असून, त्यात वय वाढलेल्या उमेदवारांनाही संधी मिळणार आहे..

कोरोना संकटामुळे याआधीही अनेकदा परीक्षा लांबणीवर गेल्या आहेत. सध्या राज्यात कोरोनाच्या ‘ओमायक्रॉन’ विषाणूचा फैलाव वेगाने होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू केले आहेत. ओमायक्राॅनला रोखण्यासाठी सरकार सतर्क झाले आहे.

Advertisement

कोरोनामुळे गेल्या वर्षीही ‘एमपीएससी’ची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने काही उमेदवारांची वयोमर्यादा ओलांडल्याने संधी हुकली होती. वयोमर्यादेमुळे संधी हुकल्याने या विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये, त्यांना पुन्हा एक संधी मिळावी, यासाठी आता एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

आयाेगाने ट्विटमध्ये काय म्हटलंय..?
“राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 साठी वय अधिक ठरलेल्या उमेदवारांना 17 डिसेंबर 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार परीक्षेची संधी उपलब्ध व्हावी, याकरिता दिनांक 2 जानेवारी 2022 रोजीची नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे.”

दरम्यान, ‘एमपीएससी’च्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असल्या, तरी नव्या तारखा अद्याप जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. परीक्षांच्या नव्या तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार असल्याची माहिती देण्यात आली.

Advertisement

कोरोनामुळे ‘एमपीएससी’ परीक्षा पुढे ढकलल्याने अनेक उमेदवारांनी कमाल वयोमर्यादा ओलांडली होती. त्यामुळे या उमेदवारांसाठी शासकीय सेवेची दारेच बंद झाली होती. त्यामुळे राज्य सरकारने या उमेदवारांचा सहानुभूतीपूर्वक विचार करीत एक वेळ विशेष बाब म्हणून परीक्षांना बसण्यास मान्यता दिली होती.

राज्य लोकसेवा आयोगाने परीक्षेबाबत अर्ज दाखल करण्यासाठीचे वेळापत्रक जाहीर केले होते. त्यानुसार, 1 मार्च 2020 ते 17 डिसेंबर 2021 या कालावधीत वयोमर्यादा ओलांडलेल्यांना 27 डिसेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करता येऊ शकेल. त्यासाठीचे ऑनलाईन शुल्क 31 डिसेंबरपर्यंत भरावे लागणार आहे.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/puUrE

Advertisement