चित्रपट रसिकांसाठी, त्यातही विशेषत: बाॅलिवूड स्टार भाईजान.. अर्थात अभिनेता सलमान खानच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी आहे.. सलमान खानला शनिवारी (ता. 25) रात्री त्याच्या पनवेल येथील फार्महाऊसवर साप चावल्याचे समोर येत आहे..
ख्रिसमस, तसेच वाढदिवसानिमित्त सलमान खान, त्याचे कुटुंबीय व काही मित्रांसह पनवेल इथल्या फार्महाऊसला शनिवारी रात्री आला होता. पनवेलमधील आपल्या फार्महाऊसवर तो आपला वाढदिवस साजरा करणार होता. कुटुंबातील सदस्य व काही खास मित्रांनाच पार्टीत सहभागी केले जाणार होते..
दरम्यान, पनवेलच्या फार्महाऊसमध्ये मध्यरात्री सलमानला साप चावला. त्यानंतर कुटुंबीय व मित्रांना त्याला तातडीने रात्री 3 वाजता कामोठे येथील ‘एमजीएम’ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. हा साप बिनविषारी असल्याचे समजते..
प्रकृती स्थिर
सलमान खानला काही तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. त्यानंतर आज (ता. 26) सकाळी 9 वाजता त्याला रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
दरम्यान, येत्या 27 डिसेंबरला सलमान खान 56 वर्षांचा होणार आहे. पनवेलमधील फार्महाऊसवर तो आपला 56 वा वाढदिवस साजरा करणार आहे. कोरोनामुळे यंदा धुमधडाक्यात वाढदिवस साजरा करणार नसल्याचे सलमानने ठरवले आहे. वाढदिवसानिमित्त एक छोटीशी पार्टी होणार असल्याचे समजते..
सलमान खानचा ‘अंतिम’ सिनेमा नुकताच रिलीज झाला. त्यात त्याच्यासोबत आयुष शर्मा मुख्य भूमिकेत दिसला होता. हा चित्रपट 26 नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. आता ‘टायगर-3’च्या शूटिंगसाठी सलमान लवकरच 15 दिवसांच्या शेड्यूलसाठी निघणार असल्याचे सांगण्यात येते…