SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

हरभजन सिंगची क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर, 23 वर्षांच्या कारकिर्दीला अखेर ‘फुल स्टाॅप’..!

क्रिकेट रसिकांसाठी एक महत्वाची बातमी आहे.. टीम इंडियाचा दिग्गज ऑफ स्पिनर हरभजन सिंग याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 1998 साली वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी हरभजन सिंग याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तब्बल 23 वर्षांनंतर त्याने क्रिकेटला अलविदा केले.

ट्विटरच्या माध्यमातून हरभजनसिंग याने आपल्या निवृत्तीची घोषणा केली. भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2001 साली जिंकलेल्या ऐतिहासिक टेस्ट सीरिजमध्ये हरभजनसिंगचा मोठा वाटा होता. त्याच बरोबर 2007 सालचा टी-20 वर्ल्ड कप, तसेच 2011 मध्ये झालेल्या वन-डे वर्ल्ड कप विजेत्या टीमचा तो सदस्य होता..

Advertisement

‘टर्बोनेटर’ या टोपण नावाने हरभजनसिंग याला ओळखले जाते. भारतीय क्रिकेटच्या सुवर्ण काळाचा तो शिलेदार होता. त्याच्यासोबत खेळणारे अनेक जण यापूर्वीच निवृत्त झाले होते..

Advertisement

हरभजनसिंगने काय म्हटलेय..?
निवृत्ती जाहीर करताना, हरभजनसिंगने म्हटलेय, की “सर्व चांगल्या गोष्टींचा कधी तरी शेवट होतो. आज मी मला सर्व काही देणाऱ्या खेळाचा निरोप घेत आहे. या 23 वर्षांच्या मोठ्या प्रवासात मला मदत करणाऱ्या सर्वांचे आभार…!”

टीम इंडियाच्या महान स्पिनरमध्ये हरभजनसिंग याचा समावेश होतो. त्याने 103 टेस्टमध्ये 415 विकेट्स, तर वन-डे क्रिकेटमध्ये 269 विकेट नि टी-20 मध्ये 25 विकेट्स घेतल्या आहेत.

Advertisement

‘आयपीएल’मध्ये मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपर किंग्ज या विजेत्या टीमचा तो सदस्य होता. नुकत्याच झालेल्या ‘आयपीएल- 2021’मध्ये तो कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला. ‘आयपीएल’मध्ये त्याने 150 विकेट्स घेतल्या आहेत.

आता काय करणार…?
निवृत्ती जाहीर करण्याआधीच तो समालोचन करीत होता. आता तो या क्षेत्रात उतरु शकतो किंवा ‘आयपीएल’मधील एखाद्या टीमचा बॉलिंग कोच होणार असल्याची चर्चा आहे. मात्र, अद्याप त्याला दुजोरा मिळालेला नाही.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/puUrE

Advertisement