गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीने अख्खे जगच वेठीला धरलेय… या संकटात अनेकांना जीव गमवावा लागला.. लाॅकडाऊनमुळे अनेकांना नोकऱ्यांवर पाणी सोडावे लागले.. काहींचे उद्योग-धंदे बसले.. अखेर त्यावर लस आल्याने काही प्रमाणात का होईना, कोरोना आटोक्यात आला..
सध्या जगभर कोरोना प्रतिबंधक लसीकरण जोरात सुरु असले, तरी कोरोना मुळापासून नष्ट झालेला नाही.. उलट नव्या जोमाने, नव्या ताकदीने त्याचे नवनवे व्हेरियंट येत आहेत. सुरुवातीला कोरोनाच्या ‘डेल्टा’ विषाणूने दहशत निर्माण केली. हे संकट हटत नाही, तोवर ‘ओमायक्रोन’ विषाणू येऊन टपकला..
आता साऱ्या जगासाठीच एक आनंदाची बातमी आलीय.. त्यामुळे कोरोना समूळ नष्ट होण्याची आशा निर्माण झालीय.. अमेरिकेतील ‘फायझर’ या फार्मा कंपनीने कोरोनावर ‘अँटी-व्हायरल’ टॅबलेट तयार केली. ‘पॅक्सलोविड’ (Paxlovid) असे या टॅबलेटचे नाव आहे..
फायझर (Pfizer)च्या या टॅबलेटच्या आपत्कालीन वापरास ‘युरोपियन युनियन औषध नियामक’ (EU Drug Regulator) विभागाने मंजुरी दिली. नंतर अमेरिकेने 12 वर्षे वा त्याहून अधिक वयाच्या उच्च-जोखीम असलेल्या रुग्णांना या गोळ्या देण्यास मान्यता दिल्याचे सांगण्यात आले.
मृत्यूची शक्यता 89 टक्क्यांनी कमी
‘पॅक्सलोविड’ टॅबलेटमुळे हॉस्पिटलमध्ये भरती होण्याचा किंवा रुग्णाचा मृत्यू होण्याचा धोका 89 टक्क्यांनी कमी होत असल्याचा दावा ‘फायझर’ कंपनीने केलाय.. अमेरिकेने 10 दशलक्ष टॅबलेट्स खरेदीसाठी 5.3 अब्ज डाॅलर खर्च केल्याचे ‘व्हाईट हाऊस’चे कोविड समन्वयक जेफ झियंट्स यांनी सांगितले.
‘फायझर’च्या कोविड टॅबलेटला अद्याप ‘युरोपियन युनियन’ने परवानगी दिलेली नसली, तरी या टॅबलेटचा वापर प्रौढांवर केला जाऊ शकते. ज्यांना गंभीर आजार होण्याचा धोका वाटतो, अशा रुग्णांवर हे औषध वापरता येणार असल्याचे युरोपियन मेडिसिन एजन्सीने म्हटले आहे..
कोविड-19 चे निदान झाल्यानंतर 5 दिवसांच्या आत शक्य तितक्या लवकर ‘पॅक्सलोविड’चा वापर सुरु करावा, असा सल्ला युरोपियन मेडिसिन एजन्सीने दिला आहे.
औषधाचा दुष्परिणाम होणार का..?
‘फायझर’च्या या कोविड टॅबलेटचे काही दुष्परिणाम होऊ शकतात. चव कमी होणे, जुलाब किंवा उलट्या होणे किंवा तसा भास होणे, असे काही सौम्य दुष्परिणाम जाणवू शकतात. गर्भवती महिलांनी या टॅबलेट वापरु नयेत आणि ते घेत असल्यास स्तनपान थांबवावे.
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/puUrE