आयुष्यात स्वत:चं हक्काचं घरटं करण्यासाठी अनेक जण रात्रीचा दिवस करतात.. मनासारखं घर घेण्यासाठी मर मर राबतात.. पै पै साठवतात. मात्र, हा घामाचा पैसा वाया जाणार नाही, याचीही काळजी घेणे गरजेचे असते, नाहीतर बिल्डरकडून लूटले जाण्याची शक्यता असते..
स्वत:चे हक्काचे घर.. ही भावनिक बाब असते. त्यामुळे बऱ्याचदा डोक्यापेक्षा मनाचे ऐकूनच निर्णय घेतले जातात. बिल्डरकडून घराचा भाव सांगताना, त्यात अन्य शुल्कांचा समावेश नसतो. मात्र, घराच्या मूळ किमतीशिवाय ग्राहकांना इतरही खर्च करावे लागतात.
घर खरेदी करताना प्रति स्क्वेअर फूट भाव गृहित धरला जातो. त्यानुसार ग्राहक रक्कम गोळा करण्याच्या कामाला लागतो, पण नंतर इतर खर्चाचा बोजा वाढत जातो नि बजेट ढासळते. त्यामुळे घर खरेदी करताना, नेमके कोणते छुपे खर्च करावे लागतात, याबाबत जाणून घेऊ या..
जीएसटी
बांधकाम सुरू असलेल्या मालमत्तेवर केवळ ५ % जीएसटी आहे. ‘म्हाडा’सारख्या काही मालमत्ता १ % जीएसटी आकारतात. सोसायटी बांधून झालेली असेल व ‘पूर्णत्वाचे प्रमाणपत्र’ असल्यास ‘जीएसटी’ भरावी लागत नाही. त्यामुळे या सगळ्या बाबींची शहानिशा करूनच घर खरेदी करावी.
मीटर जोडणीचा खर्च
मीटर जोडणीसाठी अनेकदा बिल्डरकडून अव्वाच्या सव्वा रक्कम घेतली जाते. त्यामुळे बिल्डरकडे मीटर जोडणीच्या मूळ पावतीची मागणी करा.
पार्किंग रक्कम
घराच्या किमतीत सोसायटीने आकारलेल्या पार्किंगच्या रकमेचा समावेश आहे का, याची माहिती घ्या. घराच्या आकारावरूनही पार्किंगची रक्कम ठरत असते. घर घेताना पार्किंगची रक्कम लक्षात घ्या नि योग्य तीच रक्कम बिल्डरला द्या.
देखभाल अनामत रक्कम
सोसायटी किंवा बिल्डिंगची देखभाल करण्यासाठी बिल्डर तुमच्याकडून २ ते १० वर्षांची देखभाल रक्कम ‘अनामत’ म्हणून घेतात. घराचा ताबा मिळाल्यानंतर तुम्ही या अनामत रकमेतून तुमचे पैसे वजा करू शकता.
नोंदणी शुल्क
घर घेताना नोंदणी शुल्क आणि स्टॅम्प ड्युटी रक्कम भरावीच लागते. घराच्या किमतीच्या किती टक्के नोंदणी शुल्क आहे, याची माहिती घ्या. सर्वसाधारणपणे ही रक्कम घराच्या मूळ किमतीच्या ५ ते ७ टक्के असते.
मध्यस्थ व्यक्तीचे पैसे
घर शोधून देणारी मध्यस्थ व्यक्ती घराच्या मूळ किमतीच्या २ टक्के रक्कम घेते. शक्यतो ‘विना मध्यस्थ’ घर घेण्याचा प्रयत्न करा.
मालमत्ता तपासणी खर्च
आता बॅंकांच्या होमलोनशिवाय घर घेणे शक्य होत नाही. होमलोनची रक्कम बिल्डरला देईपर्यंत झालेला प्रत्येक खर्च बँक तुमच्या गृहकर्जातून वसूल करीत असते. त्यामुळे त्याचेही नियोजन करा.
📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306018