SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

महाराष्ट्रावर ‘ओमायक्रॉन’चे संकट गडद..! पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये 7 रुग्ण आढळले..

महाराष्ट्रावरील ‘ओमायक्रॉन’चे संकट आणखी गडद होताना दिसत आहे.. डोंबिवलीतील तरुणाला ‘ओमायक्रॉन’ची (Omicron) बाधा झाल्याचे शनिवारी (4 डिसेंबर) समोर आले होते. त्यानंतर आज आणखी 7 रुग्णांची त्यात भर पडली आहे.. त्यामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे..

विशेष म्हणजे, एकट्या पिंपरी-चिंचवडमध्ये ‘ओमायक्रॉन’चे 6, तर पुण्यात 1  रुग्ण आढळला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील ‘ओमायक्रॉन’ व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या आता 8 वर गेली आहे.

Advertisement

भावंडांची भेट महागात पडली
नायजेरियातील लेगॉस शहरातून आपल्या भावाला भेटण्यासाठी 44 वर्षीय महिला 24 नोव्हेंबर रोजी पिंपरी-चिंचवडला आली होती. तिच्यासोबत आलेल्या तिच्या दोन मुली, पिंपरी-चिंचवडमध्ये राहणारा तिचा भाऊ नि त्याच्या दोन मुली, अशा एकूण 6 जणांना ‘ओमायक्रॉन’ विषाणूची लागण झाली आहे.

नायजेरियाची नागरिक असणारी भारतीय वंशाची महिला तिच्या 12 व 18 वर्षांच्या मुलींसह भावाला भेटण्यासाठी पिंपरी-चिंचवडला आली होती. चाचणीत या तिघींनाही ‘ओमायक्रॉन’ची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते.

Advertisement

दरम्यान, नंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या 13 निकटवर्तीयांची चाचणी केली असता, त्यात महिलेचा भाऊ, त्याची दीड व 7 वर्षांच्या मुलीलाही ‘ओमायक्रॉन’ची लागण झाल्याचे समोर आले. या सर्वांवर जिजामाता हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, सगळ्यांची प्रकृती स्थिर आहे.

पुण्यात एक रुग्ण
दरम्यान, पुणे शहरात आढळलेल्या 47 वर्षीय रुग्ण 18 ते 25 नोव्हेंबर दरम्यान फिनलॅंड येथे गेला होता. 29 तारखेला त्याला ताप आला. चाचणीत त्यालाही या नवीन व्हेरिएंटचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झालेय. त्याने कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली.

Advertisement

मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर अति जोखमीच्या देशांमधून आज (5 डिसेंबर) सकाळपर्यंत 4901 प्रवासी दाखल झाले आहेत, तर इतर देशांमधून 23320 प्रवासी आले आहेत.

दिल्लीतही आढळला रुग्ण
नवी दिल्लीमध्येही आज ‘ओमायक्रॉन’बाधित पहिला रुग्ण आढळून आला. टांझानिया येथून हा रुग्ण आला होता. चाचणीत त्याला ‘ओमायक्रॉन’ची लागण झाल्याचं समोर आले. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय..

Advertisement

📣 आता असेच News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306081

Advertisement