कांदा हे एक पीक असे आहे, की ते कधी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणते, तर कधी ग्राहकांच्या..! कांद्याच्या दरात कायम चढ-उतार ठरलेले. त्यातून हात ओले होतात ते फक्त व्यापाऱ्यांचेच.. कांदा उत्पादक शेतकरी नि ग्राहकालाही या कांद्याने कायम रडवलं आहे..
अवकाळी पावसामुळे शेतकरी आधीच अस्मानी संकटात सापडलाय.. त्यात शेतमालाला मिळणाऱ्या मातीमोल भावाने त्याच्यापुढे सुलतानी संकटही उभे राहिल्याचेच दिसते..
सोलापूरच्या एका शेतकऱ्याला नुकताच या कांद्याचा (onion) अनुभव आला.. बापू कवडे असे या शेतकऱ्याचे नाव. या शेतकऱ्याला कांदा विकून मिळालेल्या पैशांची पावती पाहिली, तर हसावं की रडावं, तेही समजणार नाही.. इतकी क्रुर थट्टा या बळीराजाची कोणीही केली नसेल..
नेमकं काय झालं..
सोलापूरच्या बापू कवडे या शेतकऱ्याने 24 गोण्या कांदा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत विकण्यासाठी आणला होता. त्याचे वजन भरले, 1123 किलो.. नि कांद्याला भाव मिळाला, 100 ते 200 रुपये क्विंटल.. म्हणजेच 1 ते 2 रुपये किलो..
कवडे यांना 24 गोण्या कांद्याचे जेमतेम 1665 रुपये मिळाले. त्यातून हमाली, तोलाई नि गाडीभाडे असे एकून 1651 रुपये खर्च झाले. सगळे पैसे दिल्यावर शेतकऱ्याच्या हातात राहिले, 1123 किलो कांद्याचे 13 रुपये…!
खरेतर अतिवृष्टी नि अवकाळी पावसाने शेतकऱ्याचे कसे तीन तेरा वाजवलेत, याचाच पंचनामा म्हणजे बापू कवडे यांना मिळालेली ही पावती.. शेतात मोठ्या कष्टानं पिकवलेल्या कांद्याचे केवळ 13 रुपये हाती आल्याचं पाहून कवडे यांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या…
‘तेरावे’ घालावे का..?
याबाबत माहिती मिळताच, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही जोरदार संताप व्यक्त केला.. या 13 रूपयांतून सरकारचे ‘तेरावे’ घालावे का..? असा जळजळीत सवाल राजू शेट्टी यांनी केलाय. अनेक शेतकऱ्यांनीही या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केलीय..
अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला कांदा जमिनीतच कुजला. हा ओला कांदा कवडीमोलानेही घ्यायला कुणी तयार नाही. त्यामुळे मेटाकुटीला आलेला दुसरा एक शेतकऱ्याने तर सुमारे 90 पोते कांदा मार्केटमध्ये तसाच टाकून घरचा रस्ता धरला…
📣 आता क्रिकेट अपडेट्स आणि इतर बातम्या मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306081