SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करुन शरद पवार दिल्लीत..! फडणवीसही दिल्लीत असल्याने राजकीय चर्चांना उधाण..

महाराष्ट्राच्या राजकारणात काही गुप्त खलबते सुरु आहेत का, असा प्रश्न उपस्थित होणाऱ्या घडामोडी समोर आल्या आहेत. भाजपचे केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी मार्चमध्ये राज्यात सत्ताबदल होणार असल्याचे बाॅम्ब टाकल्याने एकच खळबळ उडाली आहे.

दुसरीकडे त्याच वेळी मुंबईतील सर्व पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे अचानक राजधानी दिल्लीत दाखल झालेत. त्यांच्यासोबत ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हेदेखील आहेत.

Advertisement

शरद पवार दिल्लीला गेलेले असतानाच, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेदेखील दिल्लीतच आहेत. राणे यांच्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी व भाजपमधील ज्येष्ठ नेते दिल्लीत एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चांना उधाण आलंय…

दरम्यान, शरद पवार यांच्या दिल्लीवारीबाबत कमालीची गुप्तता पाळली जात आहे. या दौऱ्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती माध्यमांना देण्यात आलेली नव्हती. दिल्लीत होणाऱ्या विरोधकांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी पवार दिल्लीला गेल्याचे सांगण्यात आले.. मात्र, नेमकं कारण गुलदस्त्यातच आहे.

Advertisement

भाजप नेत्यांची पक्षश्रेष्ठींसोबत खलबते
देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांची दिल्लीत पक्षश्रेष्ठींसोबत खलबते सुरु आहेत. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची त्यांनी भेट घेतली. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व चंद्रकांत पाटील यांच्यातही चर्चा झाल्याचे सांगण्यात येते..

दरम्यान, दिल्लीत आज संरक्षण समितीची महत्वाची बैठकही होणार असून, पवार या बैठकीला हजर राहणार आहेत. त्याच वेळी ते केंद्रिय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अन्य नेत्यांशी चर्चा करणार असल्याचे सूत्रांकडून समजतेय.

Advertisement

पवार यांची बैठक आणि फडणवीस यांचा ‘दिल्ली दौरा’ हा केवळ योगायोग आहे का..? की त्यातून काही नवी राजकीय समीकरणे समोर येतात, याबाबत महाराष्ट्रातील जनतेला उत्सुकता लागली आहे.

📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306076

Advertisement