मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णसंख्येचा आलेख खाली आला आहे. त्यामुळे राज्यात विविध आस्थापने, नाट्यगृहे, थिएटर, मंदिरे सुरु करण्यात आली आहेत. शाळा-महाविद्यालयांमध्येही विद्यार्थी येत असले, तरी आता सरसकट शाळा सुरु करण्याची मागणी होत आहे.
ग्रामीण भागात पाचवी ते बारावी, तर शहरात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झालेले आहेत. मात्र, आता पहिलीपासून वर्ग सुरू करण्याची मागणी होत आहे. ग्रामीण भागातील शिक्षक, शाळाचालक, पालकही त्यासाठी आग्रही आहेत.
त्यानुसार आता लवकरच राज्यात पहिली ते चौथीचे वर्ग सुरु होण्याची शक्यता आहे. राज्याच्या चाईल्ड टास्क फोर्सनेही पहिलीपासून शाळा सुरु करण्यासाठी हिरवा कंदिल दाखवल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
अटी-शर्तीसह परवानगी
ते म्हणाले, की “पहिली ते चौथीचे वर्ग काही अटी-शर्तीसह सुरु करण्यास ‘चाईल्ड टास्क फोर्स’ने परवानगी दिली आहे. मात्र, विद्यार्थ्यांमार्फत कोरोना विषाणू पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे १२ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांच्या लसीकरणानंतर त्यांना शाळांमध्ये जाण्याची परवानगी देता येईल.”
राज्यात सध्या रोज ७०० ते ८०० रुग्ण आढळत आहेत. त्यात मुलांमधील गंभीर आजाराचं प्रमाण कुठेही नाही. त्यामुळे पालकांनीही चिंता करण्याचे कारण नाही, असे टोपे म्हणाले.
मुलांना कोव्हॅक्सिन लस देण्यात काहीही अडचण नसल्याचे तज्ञ्जांचे मत आहे. राज्यात लसही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. केंद्र सरकारने लहान मुलांच्या लसीकरणास परवानगी दिल्यास राज्याची तयारी असल्याचे ते म्हणाले.
तिसऱ्या लाटेची शक्यता कमी
“राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असली, तरी त्याची तिव्रता कमी असेल, असे तज्ज्ञांनी सांगितलंय. ‘डेल्टा व्हेरिएंट’ऐवजी आता दुसरा नवा व्हेरिएंट आढळलेला नाही. सध्या जर्मनी, ऑस्ट्रिया, अमेरिकेमध्ये ‘डेल्टा’चा प्रादुर्भाव दिसतोय. त्यामुळे बेफिकीर राहून चालणार नाही.”
‘चाईल्ड टास्क फोर्स’ने पहिली-चौथीपर्यंतच्या शाळा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे याबाबत विचार सुरु असून, मंत्रीमंडळाच्या बैठकीत त्यावर अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली.
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511