भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना कानपूर येथील ग्रीन पार्कच्या मैदानात आजपासून (ता. २५) रंगणार आहे. कर्णधार विराट कोहलीच्या गैरहजेरीत अजिंक्य रहाणे संघाचे नेतृत्व करताना दिसेल. शिवाय अनेक प्रमुख खेळाडूंनाही विश्रांती देण्यात आल्याने ‘प्लेइंग इलेव्हन’मध्ये मोठा बदल दिसेल.
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये कॅप्टन कोहली याच्यासह रोहित शर्मा, लोकेश राहुल, रिषभ पंतसारखे खेळाडू दिसणार नाहीत. त्यामुळे त्यांच्या जागी कोणाला संधी मिळते, याची उत्सुकता लागला आहे.
खरे तर पहिल्या टेस्टसाठी लोकेश राहुल याची निवड झाली होती. मात्र, तो दुखापतग्रस्त झाल्याने सूर्यकुमार यादव याचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. रोहित व राहुल ही नेहमीची सलामीची जोडी नसल्याने, आता शुभमन गिल आणि मयांक अगरवाल यांच्यावर ही जबाबदारी असणार आहे.
चेतेश्वर पुजारा आपल्या नेहमीच्या तिसऱ्या स्थानावर येणार असल्याचे स्पष्ट आहे, तर विराट कोहलीच्या चौथ्या स्थानावर आता अजिंक्य रहाणे किंवा पदार्पणाची संधी मिळालेला श्रेयस अय्यर येऊ शकतो.
अजिंक्य चौथ्या स्थानावर आल्यास संघाचा समतोल बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कदाचित श्रेयसलाच चौथ्या स्थानावर पाठवले जाऊ शकते..
विकेटकिपर कोण असणार..?
रिषभ पंतच्या जागी संघात वृद्धिमान साहा नि श्रीकर भरत यांची निवड झाली आहे. टीम इंडिया कोणतीही जोखीम पत्करेल असेल वाटत नाही. त्यामुळे यष्टीरक्षणाची जबाबदारी वृद्धिमान साहा याच्यावरच असेल. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून साहा संघापासून दूर आहे.
भविष्याच्या दृष्टीने संघाची बांधणी करायची झाल्यास भरतचा पर्यायही भारतीय संघ निवडू शकतो. अर्थात, सध्या तरी वृद्धीमान साहाचेच पारडे जड वाटतेय..
अशी असेल गोलंदाजी..
भारतात फिरकी गोलंदाजीला पोषक वातावरण असते. त्यामुळे पहिल्या कसोटीत तीन फिरकीपटूंचा समावेश होणार असल्याचे निश्चित आहे. आर. अश्विन, रवींद्र जडेजा यांच्या जोडीला अक्षर पटेल याचेही स्थान निश्चित समजले जात आहे.
पहिल्या सामन्यात भारतीय संघ दोनच वेगवान गोलंदाजांसह उतरू शकतो. त्यात अनुभवी इशांत शर्मा याच्या जोडीला कोणाला संधी मिळते, हे पाहावे लागेल. संघात उमेश यादव व प्रसिध्द कृष्णा यांचा समावेश केलेला आहे. अनुभवाच्या जोरावर उमेशचे स्थान बळकट वाटते आहे.
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511