‘त्या’ मंत्र्याला अटक करा’, संयुक्त किसान मोर्चाकडून थेट पंतप्रधानांना पत्र; पत्रात केल्या ‘या’ सहा मागण्या…
केंद्र सरकारने तीनही कृषी कायदे मागे घेतल्यानंतर संयुक्त किसान मोर्चाने अजून सहा मागण्या केल्या आहेत. आता या मागण्यांवर ते ठाम आहेत. सिंघु सीमेवर संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांची बैठक रविवारी दुपारी झाली. त्यात हे निर्णय झाले, अशी माहिती बलवीरसिंग राजेवाल आणि जतिंदरसिंग विर्क या भारतीय किसान युनियनच्या नेत्यांनी दिली.
संयुक्त किसान मोर्चाने पंतप्रधानांना पत्र लिहीत त्यामध्ये एमएसपीची हमी देणारा कायदा लागू करावा, असं म्हटलं आहे. ही प्रमुख मागणी आहे. तसेच लखीमपूर हत्याकांडातले आरोपी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांना मंत्रिमंडळातून बरखास्त करण्याची आणि तातडीने अटक करण्याची ही मागणी संयुक्त किसान मोर्चाने केली आहे.
शेतकऱ्यांच्या 6 प्रमुख मागण्या कोणत्या?
- शेतकऱ्यांना सरकारने किमान हमीभाव अर्थात एमएसपीची (MSP) गॅरन्टी द्यावी.
- प्रस्तावित वीज संशोधन विधेयक मागे घ्यावेत.
- देशाची राजधानी दिल्लीमधील वायू प्रदूषणाविषयी दोषी ठरवलेल्या शेतकऱ्यांना शिक्षा देण्याची तरतूद रद्द करावी.
- हरयाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश व देशामधील अनेक राज्यातील शेतकऱ्यांवर या आंदोलनावेळी काही खोटे गुन्हे दाखल केले ते मागे घ्यावे.
- लखीमपूर खेरी हत्याकांड प्रकरणातील प्रमुख सूत्रधार केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी सध्या खुलेआम फिरत आहेत त्यांना मंत्रिपदावरुन काढून अटक करावी.
- या आंदोलनादरम्यान देशभरामधील जवळजवळ 700 शेतकऱ्यांनी बलिदान दिलं आहे. त्यांच्या कुटुंबाला मदत करून त्यांच्या कुटुंबांचे पुनर्वसन करावे.
केंद्र सरकारने रविवारी झालेल्या चर्चेच्या 11 फेऱ्यांनंतर एकतर्फी घोषणा करुन हे कायदे मागे घेतले. यामध्ये समाधानकारक तोडगा न निघाल्याचं या पत्रात म्हटलंय. संयुक्त किसान मोर्चा किंवा शेतकरी आंदोलनातर्फे पंतप्रधानांच्या या घोषणेचे अधिकृत स्वागत होणार नाही. कारण ही फक्त घोषणा झाली असून हमीभावावरील कायदा, त्याचप्रमाणे वीज विधेयकासोबतच काडीकचरा जाळणाऱ्यांना शिक्षा करण्याचे विधेयक मागे घेणे अजूनही राहिलं आहे. जोपर्यंत या सदर मागण्या मान्य होत नाहीत, तोवर पंतप्रधानांनी केलेल्या या घोषणेचे आमच्याकडून स्वागत होणे शक्य नसल्याचं त्यांनी सांगितलं.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511