तळीरामांसाठी आनंदाची बातमी आहे… ठाकरे सरकारने (Thakre sarkar) मद्यविक्रीबाबत मोठा निर्णय घेतलाय. त्यामुळे मद्यप्रेमींना आता अर्ध्या किंमतीत चक्क विदेशी दारुचा आस्वाद घेता येणार आहे.
महाराष्ट्र सरकारने आयात केल्या जाणाऱ्या (इम्पोर्टेड) विदेशी दारुवरील (स्काॅच, व्हिस्की) उत्पादन शुल्कात चक्क ५० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे इतर राज्यात विकल्या जाणाऱ्या किंमतीतच आता महाराष्ट्रातही स्कॉच, व्हिस्की (scotch and whiskey) मिळणार आहे.
याबाबत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नुकतीच ही माहिती दिली. त्यानुसार, स्कॉच-व्हिस्कीवरील उत्पादन शुल्कात कपात करण्यात आली आहे. त्यामुळे या दारुच्या उत्पादनशुल्क उत्पादन खर्चाच्या ३०० वरून १५० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.
राज्य सरकारने याबाबतची अधिसूचना गुरुवारी (१८ नोव्हेंबर) जारी केल्याची माहितीही या अधिकाऱ्याने दिली. लवकरच त्याची अंमलबजावणी होणार असून, त्यामुळे तळीरामांना स्वस्तात विदेशी मद्य चाखता येणार आहे..
महसूल २५० कोटीपर्यंत वाढणार
आयात केल्या जाणाऱ्या ‘स्कॉच’च्या विक्रीतून राज्य शासनाला दरवर्षी १०० कोटी रुपयांचा महसूल मिळतो. मात्र, आता सरकारने उत्पादन शु्ल्कात कपात केल्याने स्काॅचची आयात वाढण्याची अपेक्षा आहे. त्यातून सरकारचा महसूल २५० कोटीपर्यंत वाढू शकतो.
दारुच्या तस्करीला आळा बसेल
उत्पादन शुल्क अधिक असल्याने चोरी-छुप्या मार्गाने राज्यात विदेशी दारु येत होती. मात्र, आता उत्पादन शुल्कात कपात केल्याने इतर राज्यांतून महाराष्ट्रात होणारी ‘स्कॉच’ची तस्करी, तसेच बनावट दारूच्या विक्रीलाही आळा बसणार आहे.
विक्रीत दुप्पट वाढ होण्याची आशा
उत्पादन शुल्कात करण्यात आलेल्या कपातीमुळे महाराष्ट्रात आयात केल्या जाणाऱ्या व्हिस्कीची किंमत कमी झाली आहे. सध्या महाराष्ट्रात रोज १ लाख बाटल्या विकल्या जातात, शुल्क कमी केल्याने आता अडीच लाखांवर ही विक्री पोहोचू शकते. त्यामुळे राज्याच्या महसुलात वाढ होण्याची अपेक्षा आहे.
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511