SpreadIt News | Digital Newspaper

न्युझीलंडविरुद्ध टी-20 मालिका भारताने खिशात घातली, हिटमॅन रोहित शर्माचा अनोखा विक्रम..

भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील दुसरा टी-20 सामना भारताने 7 विकेट आणि 14 चेंडू राखून जिंकला. या विजयासह भारताने तीन सामन्यांची मालिका एक मॅच बाकी असतानाच खिशात घातली आहे.

झारखंडमधील रांची येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यातही कॅप्टन रोहित शर्मा याने टाॅस जिंकला. मागील मॅचचा अनुभव लक्षात घेऊन त्याचे पुन्हा एकदा बाॅलिंगचा निर्णय घेतला.

Advertisement

न्युझीलंडचे ओपनर मार्टिन गुप्टील व डॅरेल मिचेल यांनी न्यूझीलंडला धमाकेदार सुरुवात करून दिली. पहिल्या 4.2 ओव्हरमध्येच या दोघांनी आक्रमक खेळताना 48 रनची पार्टनरशीप केली. मात्र, ते बाद झाल्यावर न्यूझीलंडच्या कोणत्याच खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही.

मार्टिन गुप्टील आणि मिचेल यांनी प्रत्येकी 31 धावा केल्या, तर ग्लेन फिलिप्स हा सर्वाधिक 34 रन करून आऊट झाला. न्यूझीलंडला 153 धावाच करता आल्या. अखेरच्या षटकांत टीम इंडियाने टिच्चून बाॅलिंग केल्याने न्युझीलंडला मोठे लक्ष्य ठेवता आले नाही..

Advertisement

या सामन्यातून गोलंदाज हर्षल पटेलचे झकास पदार्पण झाले. आपल्या 4 ओव्हरमध्ये 25 धावा देतानाच त्याने 2 विकेट घेतल्या. भुवनेश्वर, दीपक चहर, अश्विन आणि अक्षर पटेल यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.

न्यूझीलंडच्या 154 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या टीम इंडियाने आक्रमक सुरुवात केली. सलामीवीर रोहित शर्मा (55) व के. एल. राहुल (65) यांच्या शतकी भागीदारीने न्युझीलंडला सामन्यात परतण्याची संधीच दिली नाही.

Advertisement

के. एल. राहुलने तर पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक पवित्रा घेतला होता. 6 चौकार नि 2 षटकारांसह त्याने 49 चेंडूत 65 धावा केल्या. तर, सुरुवातीला सावध खेळणाऱ्या रोहित शर्माने मधल्या षटकांत एकदम टाॅप गिअर टाकला. अवघ्या 36 चेंडूत 1 चौकार नि 5 उत्तुंग षटकारांसह त्याने 55 धावा फटकावल्या.

रोहित-राहुल बाद झाल्यानंतर टीम इंडिया अडचणीत आल्याचे वाटत होते. मात्र, 18 व्या षटकात भारताला विजयासाठी 11 धावांची आवश्यकता असताना ऋषभ पंतने सलग दोन चेंडूंवर षटकार ठोकत सामना खिशात घातला.

Advertisement

न्यूझीलंडकडून एकट्या टिम साऊथीनेच 4 षटकांमध्ये 16 धावा देताना 3 बळी घेतले. न्यूझीलंडच्या इतर सगळ्याच गोलंदाजांची टीम इंडियाच्या फलंदाजांनी पिसे काढली. मालिकावीराच्या पुरस्काराने हर्षल पटेल याला गौरविण्यात आले.

भारतानं या सामन्यात विजयासह मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. घरच्या मैदानावर भारताने सलग पाचवी टी-२० मालिका जिंकली आहे.

Advertisement

हिटमॅनचा विक्रम
कर्णधार रोहित शर्माच्या नावावर या सामन्यात नवा विक्रम झाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 450 सिक्सर मारणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. इनिंगच्या चौथ्या ओव्हरमध्ये रोहितने एडम मिल्नेच्या बॉलिंगवर सिक्स मारून या विक्रमाला गवसणी घातली.

वेस्ट इंडिजचा क्रिस गेल (553) आणि पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी (476) हेच सध्या रोहितच्या पुढे आहेत. रोहितला या दोघांचा रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे. या तिघांशिवाय इतर कोणत्याही खेळाडूला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 सिक्सर मारता आलेले नाहीत.

Advertisement