भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील पहिलाच सामना थरारक झाला. भारताने या सामन्यात विजय मिळविताना टी-20 वर्ल्ड कपमध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेतला.. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, तसेच कॅप्टन रोहित शर्मा नव्या इंनिंगच्या पहिल्याच परीक्षेत पास झाले.
जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर हा सामना झाला. नाणेफेकीचा कौल रोहित शर्माच्या बाजूने लागला नि रात्री उशिरा पडणाऱ्या दवाचा विचार करुन रोहितने फिल्डिंगचा निर्णय घेतला.
भुवनेश्वर कुमारने आपल्या पहिल्याच षटकात न्यूझीलंडचा सलामीवीर डॅरील मिचेल याचा त्रिफळा उडविला. मात्र, त्यानंतर मार्क चॅपमॅन व मार्टीन गुप्तील यांनी शतकी भागीदारी करताना वैयक्तिक अर्धशतके झळकावली. चॅपमॅन 50 चेंडूंत 6 चौकार व 2 षटकारांसह 63 धावांवर आश्विनच्या बाॅलिंगवर बोल्ड झाला.
या सामन्यात अर्धशतक करणाऱ्या चॅपमॅनने अनोखा वर्ल्ड रिकॉर्ड केला. दोन देशांकडून टी-20 क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकावणारा तो जगातला पहिला फलंदाज ठरला. हाँगकाँगकडून खेळताना 2015मध्ये त्याने ओमानविरुद्ध नाबाद 63 धावा केल्या होत्या.
दरम्यान, आश्विनच्या त्याच षटकात ग्लेन फिलिप्सही बाद झाला. त्यानंतर गुप्टीलने संघाचा स्कोअर चांगल्या स्थितीत पोचविला. त्याने 42 चेंडूंत 3 चौकार 4 षटकारासह 70 धावा केल्या. मात्र, गुप्टील बाद झाल्यावर न्युझीलंडच्या स्कोअरला खिळ बसली.
न्यूझीलंडने 20 षटकांत 6 बाद 164 धावा केल्या. अश्विन व भुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येकी दाेन, तर सिराज व दीपक चहरने प्रत्येकी एक विकेट घेतली.
न्युझीलंडच्या 164 धावांचा पाठलाग करताना कॅप्टन रोहित शर्मा व लोकेश राहुल यांनी वादळी सुरुवात केली. या दोघांनी पाचव्या षटकांत धावफलकावर अर्धशतकी आकडा चढवला. मिचेल सँटनरनं टीम इंडियाला पहिला धक्का देताना लोकेशला 15 धावांवर बाद केले.
तिसऱ्या क्रमांकावर आलेला सूर्यकुमार यादव (40 चेंडूंत 6 चौकार व 3 षटकारांसह 62 धावा) व रोहित (36 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकारांसह 48) या मुंबईकर जोडीने मात्र किवी गोलंदाजांवर जोरदार प्रहार करताना अर्धशतकी भागीदारी केली.
भारताला अखेरच्या 2 षटकांत १६ धावा करायच्या होत्या. त्यात टीम साऊदीनं 19व्या षटकात श्रेयस अय्यरची विकेट घेतल्याने सामन्यात चुरस वाढवली. पदार्पण केलेल्या वेंकटेश अय्यरनं पहिल्याच बाॅलला चौकार खेचला, पण पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला.
अखेरच्या षटकातील थरार
अखेरच्या 4 चेंडू 5 धावा हव्या असताना मिचेलनं वाईड टाकला. त्यानंतर 3 चेंडूंत 3 धावा हव्या असताना रिषभनं चौकार खेचून भारताला विजय मिळवून दिला. तीन सामन्याच्या मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.