मराठी आपली मातृभाषा.. महाराष्ट्राची राज्यभाषा.. मात्र, याच राज्यातील मराठी शाळा ओस पडल्या आहेत. दुसरीकडे इंग्रजी शाळांचे पेव फुटले आहे. त्यांच्या अव्वाच्या सव्वा फी भरताना पालकांचे कंबरडे मोडले, तरी इंग्रजी शाळांचा सोस काही कमी होत नाही.
अनेक इंग्रजी शाळांमध्ये मराठी शिकवले जात नाही, इतकेच काय तर या शाळांच्या आवारात साधे मराठीत बोललेलेही चालत नाही. अशा शाळांना ठाकरे सरकारने चांगलाच दणका दिला आहे.
यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून इयत्ता पहिलीपासून सर्व माध्यमांच्या शाळांना मराठी भाषा विषय शिकविण्याची सक्ती केली जाणार आहे. ठाकरे सरकारने हा निर्णय घेतला असून, त्याचे पालन न करणाऱ्या शाळांना तब्बल १ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.
सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकविणे बंधनकारक करण्यात आले आहे. चालू शैक्षणिक वर्षापासूनच पहिलीपासून या शाळांना मराठी भाषा शिकवावी लागणार आहे. नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्या शाळांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.
एक लाखांचा दंड केला जाणार
शिक्षण विभागातर्फे सर्व माध्यमांच्या शाळांना याबाबत सूचना केल्या आहेत. मराठी न शिकविणाऱ्या शाळांकडून एक लाख रुपये दंड वसूल करण्याचे निर्देश शिक्षण संचालनालयाने दिले आहेत. त्यामुळे सर्व माध्यमाच्या शाळांना या नियमाचे पालन करावे लागणार आहे.
राज्यात सर्व शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जावी, यासाठी ‘महाराष्ट्र मराठी भाषा शिकणे आणि शिकवणे कायदा 2020’ राज्य सरकारने संमत केलेला आहे.
राज्यातील सर्व खासगी अनुदानित किंवा सरकारी तसेच शिक्षणाच्या सर्व माध्यमांमध्ये आणि राज्यातील सर्व अभ्यासक्रमांच्या किंवा मंडळांच्या सर्व शाळांमध्ये मराठी विषय अनिवार्य केला गेला आहे. शाळेला मान्यता देतानाच मराठी भाषा शिक्षणाची अट अनिवार्य केली आहे.
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511