SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

गडचिरोलीमध्ये चकमकीत 26 नक्षलवाद्यांचा खात्मा.. तीन जवान जखमी, वर्षभरातली सर्वात मोठी कारवाई

गडचिरोली जिल्ह्यातील ग्यारापट्टीच्या जंगलात शनिवारी (ता. 14) महाराष्ट्र पोलिस व नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक उडाली. सकाळपासून सुरू असलेल्या या कारवाईमध्ये 26 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले आहे. या चकमकीत तीन जवानही जखमी झाले.

गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी ही माहिती दिली. त्यानुसार, गडचिरोलीतील ग्यारापत्ती जंगलात शनिवारी सकाळपासूनच पोलिस व नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक उडाली होती.

Advertisement

धानोरा तालुक्यातील मुरुम गावाजवळील जंगलात छत्तीसगडमधून मोठ्या प्रमाणात आलेले नक्षलवादी लपून बसल्याची माहिती पोलिसांच्या गस्ती पथकास मिळाली. त्यानुसार नक्षलवाद विरोधी पथकाने या परिसरात कोम्बिंग ऑपरेशन सुरु केले. त्यातून जवान व नक्षलवाद्यांमध्ये गोळीबार सुरु झाला.

26 नक्षलवाद्यांना कंठस्नान
पोलिस जवानांनी जोरदार प्रत्त्युत्तर देताना नक्षलवाद्यांचा हल्ला परतवून लावला. दिवसभर चाललेल्या धुमश्चक्रीत जवानांनी मोठ्या हिंमतीने लढा देताना 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातल्याची माहिती पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली.

Advertisement

3 पोलिस जवान जखमी
दरम्यान, नक्षलवाद्यांच्या गोळीबारात पोलिस दलातील 3 जवान जखमी झाले. त्यांना तातडीने हेलिकॉप्टरद्वारे उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले. या कारवाईत ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटलेली नाही. मात्र, त्यात नक्षलवाद्यांच्या मोठ्या नेत्याचाही समावेश असण्याची शक्यता आहे.

मृतांचा आकडा वाढणार..
ग्यारापत्ती पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मरदिन टोला जंगलात ही चकमक झाली. या घनदाट जंगलात आणखी नक्षलवादी लपून बसल्याची शक्यता आहे.

Advertisement

जवानांकडून अद्यापही परिसरात शोधमोहीम सुरू आहे. चकमक झालेल्या ठिकाणास जवानांनी वेढा दिलेला आहे. मृत नक्षलवाद्यांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

2018 मध्ये कसनासुर बोरीयाच्या चकमकीत 38 माओवादी ठार झाले होते. त्यानंतरची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात येते.

Advertisement