SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

परीक्षा फी भरली 415 रुपये, परत मिळणार फक्त 59 रुपये..! दहावी-बारावीच्या विद्यार्थी-पालकांमध्ये नाराजी.. बोर्डाने काय खर्च केलाय वाचा..

कोरोनामुळे दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे परीक्षेसाठी घेण्यात आलेले शुल्क विद्यार्थ्यांना अंशत: परत करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे. मात्र, त्यानंतरही पालकांनी नाराजी व्यक्त केलीय..

त्यालाही कारणही तसेच आहे.. मंडळाने लाखो विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्कापोटी 415 रुपये जमा करून घेतले होते. मात्र, दहावीच्या विद्यार्थ्यांच्या हातात 59 रुपये, तर बारावीच्या विद्यार्थ्यांना अवघे 94 रुपये परतावा मिळणार आहे. बोर्डाने सगळा खर्चही समोर ठेवला आहे.

Advertisement

दहावीच्या परीक्षेसाठी राज्यातील तब्बल १३ लाख ८० हजार विद्यार्थी, तर बारावीच्या परीक्षेसाठी १६ लाख ५८ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. कोरोनामुळे राज्य सरकारने सगळ्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मुल्यांकनाच्या आधारे गुण देण्यात आले.

दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी 415 रुपये परीक्षा शुल्क दिले होते. मात्र, परीक्षा न झाल्याने शुल्कापोटी दिलेले पैसे परत करण्याची मागणी केली जात होती. अखेर बोर्डाने परीक्षा शुल्काचा अंशतः परतावा देणार असल्याचा परिपत्रक काढले आहे.

Advertisement

मंडळाचा झालेला खर्च
हा परतावा देण्यापूर्वी बोर्डाने झालेला खर्चही समोर ठेवला आहे. परीक्षा रद्द झाली असली, तरी परीक्षेची तयारी पूर्ण झाली होती. प्रश्नपत्रिका संपादन छपाई, उत्तरपत्रिका छपाई, इतर तयारी करणे व प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका विभागीय मंडळात पोहचविण्यासाठी प्रत्येकी 321 रुपये खर्च झाले.

परीक्षा रद्दच झाल्याने उर्वरित परीक्षकांचा पेपर तपासण्यासाठीचे मानधन दिले नाही, ते उरलेले 94 रुपये परतावा म्हणून देण्यात येत आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांच्या शुल्कातून अकरावी सीईटीसाठी उभारण्यात आलेल्या ऑनलाईन यंत्रणेचा खर्च वजा जाता 59 रुपयांचा शुल्क परतावा दिला जाणार आहे.

Advertisement

कसा मिळणार परतावा..?
राज्य मंडळातर्फे प्रसिध्द करण्यात आलेल्या लिंक व पात्र विद्यार्थ्यांची निश्चिती शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना करावी लागेल. त्यानंतर राज्य मंडळातर्फे संबंधित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाकडे विद्यार्थ्यांचे शुल्क जमा केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

राज्य मंडळाला २२ कोटींचा तोटा
राज्य मंडळाला दहावीच्या एकूण विद्यार्थ्यांना तब्बल ९ कोटी ७८ लाख २२ हजार रुपये, तर बारावीच्या विद्यार्थ्यांना तब्बल १२ कोटी ९७ लाख २० हजार रुपये शुल्क परतावा द्यावा लागणार आहे. त्यामुळे परीक्षा रद्द झाल्याने मंडळाला तब्बल २२  कोटींचा तोटा झाल्याचे समोर आले आहे.

Advertisement

📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement