दिवाळीचा फराळ खाऊन तोंडाची चव गेली असेल ना.. बाहेर हाॅटेलमध्ये जाऊन जरा झणझणीत, चमचमीत खाण्याचा बेत असेल, तर खिशात जरा जास्तीची रक्कम ठेवा.. हॉटेलवाल्यांनी म्हणे, सर्वच खाद्य पदार्थांची दरवाढ करण्याचा निर्णय घेतलाय…
होय.. आता हाॅटेलींग महागणार आहे.. कोरोना संकटामुळे गेल्या दीड वर्षापासून हाॅटेलला टाळे लागलेले होते. नंतर इंधन दरवाढीचे आकडे रोज नवनवे विक्रम करीत आहेत. त्यात वाढलेली मजुरी.. त्यामुळे हाॅटेल चालविणे आवाक्याबाहेर गेले आहेत..
या धंद्यातून रोजचा खर्चही निघत नसल्याने अनेक मालकांनी कधीच हाॅटेल बंद केली आहेत. काहींची सुरु असली, तरी आता हा व्यवसाय आत बट्ट्याचा ठरत आहे.
सगळ्याच वस्तूंचे दर वाढत असल्याने हॉटेलमधील खाद्यपदार्थांचे दर वाढविण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांची राज्य संघटना असलेल्या ‘आहार’ने खाद्यपदार्थांच्या दरात ३० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र, या दरवाढीचा फटका राज्यातील खवय्यांना बसणार आहे.
राज्यातील रेस्टारंटमधील सर्व खाद्य पदार्थांचे दर तब्बल 30 टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय महाराष्ट्रातील रेस्टारंट मालक संघटनेच्या विचाराधीन असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे रेस्टाॅरंटमध्ये जाऊन चमचमीत खाद्य पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी अधिकचे पैसे ग्राहकांना मोजावे लागू शकतात..
सगळ्याच वस्तूंचे दर वाढले
गेल्या काही दिवसांत पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्याने सगळ्याच वस्तूंचे दर वाढलेत. व्यावसायिक सिलिंडरसाठी आता 20२३ रुपये मोजावे लागत आहेत. हॉटेलमध्ये सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या सोयाबीन, सूर्यफुल तेलाचे दर १४० ते १५० रुपये लिटरवर गेले आहेत.
तूर डाळीच्या दरानेही कधीच शंभरी पार केलीय, इतर डाळीही महागल्या आहेत. कांदा ५० ते ६० रुपये किलोने घ्यावा लागतो. कामगारांना वेतनवाढ करावी लागणार आहे. हा सगळा खर्च भागविण्यासाठी खाद्य पदार्थांचे दर वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले..
दोन वर्षांनंतर होतेय दरवाढ
हॉटेलमधील खाद्य पदार्थांचे दर दरवर्षी साधारण जून महिन्यात वाढविले जातात. मात्र, कोरोनामुळे हाॅटेल बंद असल्याने ही दरवाढच झालीच नाही. आता काही हॉटेल चालकांनी दरवाढ करण्यास सुरुवात केली आहे, काही करीत आहेत. कोरोनामुळे हॉटेल व्यवसाय 5 वर्षे मागे गेल्याचे चालकांचे म्हणणे आहे.
तसेच कोरोनाचा फटका सर्वसमान्य ग्राहकांनाही बसलेला आहे. त्यामुळे ही दरवाढ करताना या बाबीचाही विचार करणार असल्याचे ‘आहार’चे उपाध्यक्ष निरंजन शेट्टी यांनी सांगितले.
📣 तुम्ही ग्रुप अॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511