SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरची सुरक्षा वाढविली, टॅक्सी चालकाचा एक काॅल नि मुंबई पोलिस ‘अ‍ॅक्शन मोड’मध्ये..! नेमकं काय घडलं..

फेब्रुवारी 2021 मध्ये देशभर मनसुख हिरेन प्रकरण चांगलेच गाजले होते. भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील ‘अँटिलिया’ निवासस्थानाबाहेरील २५ फेब्रुवारी रोजी बेवारस स्कॉर्पिओ आढळून आली. तपासात या गाडीत जिलेटीनच्या कांड्या, धमकीपत्र सापडल्याने एकच खळबळ उडाली होती.

हा सगळा आता इतिहास झालेला असला, तरी त्याच्या आठवणी कायम आहेत. हे नुकत्याच घडलेल्या घटनेने पुन्हा एकदा समोर आले. गेल्या वेळचा अनुभव असल्याने पोलिस आता ताकही फुंकून पित असल्याचे पाहायला मिळते..

Advertisement

नेमकं काय झालं..?
मुंबई पोलिसांना एका टॅक्सीचालकाने सांगितले, की त्याच्या टॅक्सीत आज (ता. 8) दोन पर्यटक बसले होते. मात्र, ते सातत्याने या चालकाला मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ घराचा पत्ता विचारत होते. त्या दोघांकडे कशाने तरी भरलेली एक भली मोठी बॅग असल्याचेही चालक म्हणाला..

हे दोन संशयित उर्दू भाषेत संवाद साधत होते. पर्यटक म्हणून बसलेल्या या दोघांचे वर्तन संशयास्पद वाटल्याने टॅक्सीचालकाने लगेच मुंबई पोलिसांना याबाबत खबर दिली. त्यानंतर मुंबई पोलिसही लगेच ‘अॅक्शन मोड’मध्ये आले.

Advertisement

अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात
कोणतीही रिस्क न घेता, तातडीने अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ निवासस्थानाबाहेरील पोलिस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली. परिसरातही अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी केली जात आहे.

टॅक्सी चालकाने याबाबत माहिती दिल्यानंतर आझाद मैदान पोलिस ठाण्यात बोलावून त्याचा जबाब नोंदवून घेण्यात आला. या प्रकरणात चालकाने दिलेली माहिती पडताळून पाहत असल्याचेही पोलिसांनी म्हटलंय.

Advertisement

📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511 

Advertisement