SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

छत्रपती ताराराणींवर साकारतोय जगातील पहिला मराठी हॉलिवूडपट; ही अभिनेत्री साकारणार मुख्य भूमिका..

छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले स्वराज्य अबाधित राखण्याचे काम छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज यांनी केले.. पण स्वराज्य रक्षणाच्या कार्यात महत्त्वाच्या ठरल्या त्या ‘छत्रपती महाराणी ताराराणी’…!

पुरुषप्रधान संस्कृतीला छेद देताना मुगल, निजामशाही, कुतुबशाही, आदिलशाही, डच, इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी अशा सत्तांविरुद्ध महाराणी ताराराणी यांनी निकराचा लढा दिला.

Advertisement

महाराष्ट्राच्या दैदीप्यमान इतिहासात कर्तृत्व गाजवणाऱ्या छत्रपती ताराराणी यांच्यावर आधारित चित्रपट पुढच्या वर्षी दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येतोय..

मराठ्यांच्या स्वराज्याची धुरा यशस्वीपणे सांभाळणाऱ्या महाराणी ताराराणी यांचा इतिहास ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ (Chatrapati Tararani) हा चित्रपट प्रेक्षकांसमोर येणार आहे.

Advertisement

प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (sonalee kulkarni) हिने ‘हिरकणी’ चित्रपटातून कसदार अभिनय केला. तिच आता छत्रपती ताराराणी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. भाऊबीजेच्या दिवशी सोनालीने या सिनेमाचं पहिलं ‘मोशन पोस्टर’ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलं.

विशेष म्हणजे, ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ हा जगातील पहिला मराठी हॉलिवूड सिनेमा असल्याचं जाहीर करण्यात आलंय. ‘प्लॅनेट मराठी’चे संस्थापक अक्षय बर्दापूरकर आणि ‘गोल्डन रेशियो फिल्म्स’ यांच्या प्रयत्नातून लंडनमधील ‘ब्लॅक हँगर स्टुडिओ‘, ‘ओरवो स्टुडिओ’ या चित्रपटाच्या माध्यमातून मराठीत पदार्पण करीत आहेत.

Advertisement

लंडनमध्येच या चित्रपटाचे चित्रीकरण, तांत्रिक बाबी ठरणार आहे. मराठी, तसेच इंग्रजी भाषेत हा चित्रपट चित्रित होणार आहे. त्यामुळे छत्रपती ताराराणींची शौर्यगाथा सातासमुद्रापार पोहोचणार आहे..

सोनालीने काय म्हटलंय..?
चित्रपटाचे दिग्दर्शन राहुल जनार्दन जाधव करणार आहेत. कथा व संवाद लेखन डॉ. सुधीर निकम यांनी केलंय. सोनाली कुलकर्णी म्हणाली, की “छत्रपती ताराराणींचे प्रेरणादायी आयुष्य आणि तडफदार व्यक्तिमत्व पडद्यावर साकारण्याचे भाग्य लाभणं, हे एका कलाकारासाठी आयुष्यातली सगळ्यात मोठी अभिमानाची गोष्ट आहे.”

Advertisement

“आजवर ज्या रणरागिणीविषयी कुठल्याही चलचित्र माध्यमात फार काही केलं गेलेलं नाही, तिच्या कर्तृत्वाचे पोवाडे गाणं हे अत्यंत आव्हानातमक काम असेल, या जबाबदारीची जाणीवही मला आहे. महाराजांचा आशिर्वाद आम्हाला लाभो, आई भवानीने आमच्या मनगटात ही कामगिरी पार पाडण्याचं बळ भरावं, बास हीच प्रार्थना..!”

📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511 

Advertisement