टी-20 वर्ल्ड कप संपल्यावर टीम इंडियाचे मुख्य कोच रवी शास्त्री यांचा करार संपुष्टात येणार आहे. शास्त्री यांच्या जागी ‘बीसीसीआय’ने आधीच माजी क्रिकेटपटू राहूल द्रविड याची भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नेमणूक केलेली आहे.
दरम्यान, टीम इंडियाच्या हेड कोचच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यावर रवी शास्त्री नेमकं काय करणार? अन्य संघाचा प्रशिक्षक होणार की, त्याचे आवडते काम समालोचन करणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली होती… मात्र, आता शास्त्री यांना नवी जबाबदारी मिळणार असल्याचे समोर येतंय..
रवी शास्री येत्या काळात मुख्य प्रशिक्षक म्हणूनच काम पाहणार असल्याचे सूत्रांकडून समजले. त्यानुसार, ते आयपीएलमधील एका संघाचे प्रशिक्षक राहणार आहेत.
आयपीएलमधील नवीन अहमदाबाद फ्रँचायझी रवी शास्त्री आणि त्यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघातील इतर सपोर्ट स्टाफ सदस्यांशीही करार करणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर हेही अहमदाबाद कोचिंग स्टाफमध्ये सामील होण्याची शक्यता आहे.
अहमदाबाद संघाचे प्रशिक्षक होणार..?
आयपीएल संघाच्या मालकांच्या प्रवर्तकांनी रवी शास्री यांच्याशी अलीकडेच संपर्क साधल्याचे समजते. मात्र, टीम इंडियाच्या वर्ल्ड कप मोहिमेतून लक्ष विचलित व्हायला नको, म्हणून रवी शास्री यांनी विश्वचषक संपेपर्यंत निर्णय घेण्यासाठी वेळ मागितला आहे.
कर्णधार विराट कोहलीसोबत मतभेद झाल्यानंतर अनिल कुंबळे याने 2017 मध्ये हेड कोच पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची निवड झाली होती.. मात्र, सध्या सुरु असलेल्या टी-20 वर्ल्ड कपनंतर त्यांचा कार्यकाळ संपणार आहे.
आपल्या भारदस्त समालोचनासाठी रवी शास्त्री चांगलेच प्रसिद्ध आहेत. आपल्या आयकॉनिक आवाजाने क्रिकेट चाहत्यांना वेड लावले.
२००७मधील T-20 विश्वचषकातील युवराज सिंगचे 6 चेंडूत 6 षटकार असो, किंवा 2011 च्या विश्वचषक फायनलमधील एम.एस. धोनीचा विजयी षटकार.. शास्री यांचा आवाज क्रिकेट रसिकांच्या मनात कायमचा कोरला गेला आहे.
📣 तुम्ही ग्रुप अॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511