टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील उपान्त्य फेरीतील तीन संघ फायनल झाले आहेत. आज (रविवारी) न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील लढतीच्या निकालाद्वारे ‘गट-2’मधून उपांत्य फेरीतील चौथा संघ कोण असेल, हेही ठरणार आहे.. टीम इंडियाचे भवितव्य या लढतीवर अवलंबून आहे.
पहिल्या ग्रुपमध्ये अखेरच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा पराभव केला, तरी दक्षिण आफ्रिकेचे सेमी फायनलचे स्वप्न भंगले आहे. पहिल्या ग्रुपमधून इंग्लंड, तर नेट रनरेटच्या आधारे ऑस्ट्रेलिया सेमी फायनलमध्ये पोहोचले आहेत.
दुसऱ्या ग्रुपमधून पाकिस्तान टीम सेमी फायनलमध्ये दाखल झाली आहे. चौथ्या स्थानासाठी भारत, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यात मोठी चुरस लागली आहे. या पार्श्वभूमीवर आज अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामना होत आहे. अफगाणिस्तानच्या विजयासाठी भारतीयांनी देव पाण्यात बुडविले आहेत..
न्युझीलंडने अफगाणिस्तानचा पराभव केल्यास न्यूझीलंड संघाचे 8 गुण होतील व मग नेट रननेटला काहीही अर्थ राहणार नाही. न्युझीलंड संघ आरामात सेमी फायनलमध्ये पोचणार आहे. मात्र, या सामन्यात अफगाणिस्तानने काही चमत्कार करुन न्यूझीलंडचा पराभव केल्यास भारतासाठी सेमी फायनलचे दरवाजे उघडणार आहेत.
अफगाणिस्तानचा विजय झाल्यास नामिबियाविरुद्धच्या उद्याच्या (ता. 8) अखेरच्या लढतीत भारताला मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. त्यानंतर नेट रनरेटच्या आधारे भारताचा संघ सेमी फायनलमध्ये जाऊ शकतो..
टी-20 वर्ल्ड कपच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये टीम इंडियाची कामगिरी अत्यंत खराब झाली. पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने भारताला 10 विकेटने पराभूत केले, नंतर न्यूझीलंडविरुद्धही भारताचा 8 विकेटने पराभव झाला.
सुरुवातीला बसलेल्या दोन धक्क्यानंतर टीम इंडियाला जाग आली. नंतर भारताने जोरदार पुनरागमन करताना, अफगाणिस्तानविरुद्ध 66 धावांनी विजय मिळविला. नंतर स्कॉटलंड संघाचा तर अक्षरक्ष: खुर्दा उडविला.. स्कॉटलंडचे आव्हान भारताने फक्त 39 बॉलमध्येच पूर्ण केलं होतं.
📣 तुम्ही ग्रुप अॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511