SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

भारताचा स्कॉटलंडवर धमाकेदार विजय..! आता कसे असेल सेमी फायनलचे गणित..?

टी-20  वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान व न्युझीलंड यांच्याकडून पराभव झाल्यानंतर सेमी फायनलमध्ये जागा मिळविण्यासाठी टीम इंडियाची धावपळ सुरु आहे. तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने अफगाणिस्तानचा ६६ धावांनी पराभव केला होता. तर चौथ्या सामन्यात स्कॉटंलड टीमचा अक्षरक्ष: खुर्दा उडविला..

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये प्रथमच नाणेफेकीच कौल भारताच्या बाजूने लागला. बर्थ-डे बाॅय, कॅप्टन विराट कोहली याने कोणताही विचार न करता फिल्डिंगचा निर्णय घेतला.

Advertisement

महत्वाच्या सामन्यात गोलंदाजी कशी करायची असते, याचा उत्तम वस्तुपाठच भारतीय संघाने दाखवून दिला. जसप्रीत बुमराहने स्कॉटलंडला तिसऱ्या षटकातच पहिलाच धक्का दिला. त्यानंतर रवींद्र जाडेजाने तीन विकेट्स मिळविताना स्कॉटलंडचे कंबरडेच मोडले.

मोहम्मद शमीनेही ३ विकेट घेऊन जाडेजाला चांगली साथ दिला. आर. अश्विन व बुमराह यांनी प्रत्येकी १ विकेट घेताना स्कॉटलंडला अवघ्या ८५ धावांवरच रोखले. ठराविक अंतराने फलंदाज बाद होत गेल्याने स्काॅटलंड संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

Advertisement

आपले रनरेट सुधारण्यासाठी भारताला ८६ धावा फक्त ७.१ षटकांत करायच्या होत्या. सेमी फायनलचे गणित डोक्यात ठेवून टीम इंडियाने पहिल्या चेंडूपासूनच स्काॅटलंडच्या बाॅलरवर हल्ला चढविला. त्यामुळे स्काॅटलंड बाॅलरही गांगरुन गेले…

लोकेश राहुलने फक्त १९ चेंडूंत ६ चौकार आणि ३ षटकारांच्या जोरावर ५० धावांची खेळी साकारली, तर रोहित शर्माने १६ चेंडूंत ५ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ३० धावा केल्या.

Advertisement

रोहित व राहुल यांच्या धमाकेदार फटकेबाजीमुळे भारताने चौथ्या षटकांतच अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी मैदानावर चौकार आणि षटकारांची आतीषबाजी केली. रोहित शर्मा बाद झाल्यावर बर्थ-डे बाॅय विराट बॅटिंगसाठी मैदानात उतरला.

दरम्यान, फिफ्टी झाल्यावर त्यापुढच्या बाॅलवर राहुलही बाद झाला. त्यानंतर मॅच लवकर संपविण्यासाठी हार्दिक पांड्या मैदानात उतरेल असे वाटत होते. मात्र, त्याऐवजी मैदानात आलेल्या सूर्यकुमार यादव याने त्याच्या दुसऱ्याच चेंडूवर खणखणीत षटकार ठोकताना, अवघ्या 6.3 षटकात संघाला विजय मिळवून दिला.

Advertisement

कसे असेल सेमी फायनलचे गणित..?
भारताने सुरुवातीला अफगाणिस्तान व नंतर स्काॅटलंडचा मोठ्या अंतराने पराभव केल्याने सेमी फायनलच्या रेसमध्ये अजूनही भारत टिकून आहे. पाकिस्तान, न्युझीलंड नंतर भारताने गुणतालिकेत आता तिसरे स्थान पटकावले आहे.

टीम इंडियापेक्षा न्युझीलंड संघाचे दोन गुण अधिक आहेत. रविवारी न्युझीलंडची लढत अफगाणिस्तानसोबत, तर भारताचा सामना नामेबियासोबत होणार आहे. अफगाणिस्तान संघाने न्युझीलंडचा पराभव केला नि भारताने नामेबिया संघाला हरविल्यास नेट रनरेटच्या आधारे टीम इंडियाला सेमी फायनलमध्ये जागा मिळू शकते.

Advertisement

सध्या तरी टीम इंडियासह चाहत्यांच्या नजरा अफगाणिस्तान व न्युझीलंड यांच्यातील सामन्यावर लागल्या आहेत. मात्र, या सामन्यात न्युझीलंड जिंकल्यास त्यांचे ८ गुण होतील व मग टीम इंडियासाठी सेमी फायनलमध्ये पोचता येणार नाही..

📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511 

Advertisement