पेट्रोल-डिझेलवरील कर कपातीबाबत महाराष्ट्र सरकारची भूमिका स्पष्ट, राज्यातील नागरिकांना मिळणार का दुहेरी लाभ, वाचा..
देशात काही दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या दर गगणाला भिडले होते. त्यामुळे केंद्र सरकारबाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत होती. पेट्रोलनंतर डिझेलच्या दरानेही कधीच शंभरी गाठली होती. अखेर मोदी सरकारने देशवासियांना दिवाळीचे मोठे गिफ्ट दिले.
मोदी सरकारने पेट्रोल व डिझेलवरील ‘एक्साईज ड्यूटी’ कमी केली. त्यामुळे देशभरात पेट्रोल 5 रूपयांनी, तर डिझेल 10 रूपयांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसांत जनतेला मोठा दिलासा मिळाला.
केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर अनेक भाजपशासीत राज्यांनीही आपल्या करात कपात केली. त्यामुळे नागरिकांचा दुहेरी फायदा झाला. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते..
ठाकरे सरकार काय म्हणतंय..?
अखेर ठाकरे सरकारची भूमिका समोर आली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार सध्या तरी पेट्रोल-डिझेलच्या करात कपात करण्याच्या विचारात नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांना फक्त मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयाचाच फायदा होणार आहे.
केंद्र सरकारने उत्पादनशुल्कात कपात केल्यानंतर राज्य सरकारमध्ये देखील या विषयावर चर्चा झाली. मात्र, महाराष्ट्रात कर कपात करण्यास अधिकाऱ्यांनी नकारात्मक भूमिका घेतली. कोरोना संकटामुळे राज्याच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे.
राज्याच्या तिजोरीत खडखडाट..
सध्या राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे.. अशात पेट्रोल-डिझेलवरील करात कपात केली, त्यावरील व्हॅट कमी केल्यास राज्याचे उत्पन्न आणखी घटेल. राज्याला सर्वाधिक उत्पन्न दारूच्या उत्पादन शुल्कातून आणि पेट्रोल-डिझेलवरील करातूनच मिळते.
महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलवरील कर कपात केल्यास मोठे उत्पन्न घटणार आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत राज्य सरकार कोणतीही कर कपात करण्याच्या विचारात नसल्याचे सांगण्यात येते.
भाजप नेते आक्रमक..
मोदी सरकारने कर कपात केल्याने महाराष्ट्रातील भाजप नेते आक्रमक झाले असून, आता ठाकरे सरकारनेही कर कपात करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी केली जात आहे. त्यामुळे आगामी काळात राज्य सरकार काय निर्णय घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
📣 तुम्ही ग्रुप अॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511