SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

100 कोटी वसूली प्रकरणात आणखी एक ट्विस्ट, परमबीर सिंह यांचे आयोगाकडे प्रतिज्ञापत्र सादर, त्यात काय म्हटलंय पाहा..

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी 100 कोटींच्या वसुलीचा लेटर बॉम्ब टाकल्यानंतर देशभर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर नुकतीच देशमुख यांना ईडीकडून अटक झाली असून, त्यांची रवानगी कोठडीत झाली आहे.

दरम्यानच्या काळात परमबीर सिंह यांच्याविरुद्धही ठाणे व मुंबईत खंडणी व फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले नि नंतर परमबीर सिंह गायबच झाले. ठाणे न्यायालय, मुंबईतील किला कोर्टानं त्यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलंय. त्यांच्याविरोधात लूक आऊट नोटीस जारी केली आहे.

Advertisement

परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने माजी न्यायमूर्ती कैलास उत्तमचंद चांदीवाल यांच्या नेतृत्वाखाली एक सदस्यीय चौकशी आयोग नेमला आहे. मात्र, परमबीर सिंह एकदाही चौकशीसाठी हजर राहिलेले नाहीत..

परमबीर सिंह बेपत्ता..
आयोगाने परमबिर सिंह यांना अनेकदा समन्स, जामीनपात्र वॉरंट बजावले. मात्र, त्यानंतरही सिंह सुनावणीला हजर राहिले नाहीत. त्यामुळे चौकशी आयोगाने परमबीर सिंह यांच्यावर जूनमध्ये 5 हजार रुपये व नंतर दोन वेळा 25 हजार रुपयांचा दंडही ठोठावला होता.

Advertisement

चांदिवाल आयोगापुढे हजर होण्यास टाळाटाळ करणाऱ्या परमबीर सिंग यांनी आपले वकिल चंद्रचूड सिंग यांच्यामार्फत आयोगाकडे नुकतेच एक प्रतिज्ञापत्र सादर केलेय. त्यामुळे या प्रकरणात आणखी एक ट्विस्ट आलाय.

प्रतिज्ञापत्रात म्हटलंय की..
प्रतिज्ञापत्रात परमबीर सिंह यांनी म्हटलंय, की ‘अनिल देशमुख यांच्याविरोधात आता आपल्याजवळ देण्यासारखे कोणतेही पुरावे शिल्लक नाहीत..!’

Advertisement

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राशिवाय, त्यांच्या आरोपाबाबत त्यांच्याकडे अतिरिक्त तपशील किंवा पुरावे नसल्याचं परमबीर सिंह यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे कळविले आहे. या प्रकरणी परमबीर सिंह कोणत्याही उलट तपासणीसाठीही तयार नसल्याचे सांगण्यात येतं

विशेष म्हणजे, परमबीर सिंग यांनी गेल्या 13 ऑक्टाेबरलाच हे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. मात्र, अनिल देशमुख यांना अटक नि कोठडी मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ही माहिती समोर आलीय. त्यामुळे या प्रकरणात वेगळाच ट्विस्ट आला आहे.

Advertisement

परमबीर सिंग यांनी स्वतः तयार केलेले हे ‘पॉवर ऑफ अटर्नी’ चंदीगडमध्ये तयार केल्याचे दिसते. त्यावर पत्ता ‘चंदीगड’ असल्याचे दिसते. त्यामुळे परमबीर सिंह हेही चंदीगडमध्ये असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511 

Advertisement