नरेंद्र मोदी यांच्या सभेत बाॅम्बस्फोट प्रकरणी 4 जणांना फाशीची शिक्षा, 8 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं..?
बिहारची राजधानी पाटणा येथील गांधी मैदानात 8 वर्षांपूर्वी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हुंकार रॅलीत साखळी बॉम्बस्फोट झाले होते.
याप्रकरणी ‘एनआयए’ विशेष कोर्टाने सोमवारी (1 नोव्हेंबर) 4 दहशतवाद्यांना फाशीची शिक्षा ठोठावली. इम्तियाज अन्सारी, हैदर अली ऊर्फ ब्लॅक ब्युटी, नोमान अन्सारी, मुजिबुल्ला अन्सारी अशी त्यांची नावे आहेत.
या गुन्ह्यातील अन्य दोन दोषी ओमर सिद्दीकी, अझरुद्दीन यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली, तर अहमद हुसैन, फिरोज अस्लम या दोघांना १० वर्षांच्या कारावास, तसेच इफ्तेखार आलमला याला 7 वर्षांची शिक्षा दिली. दरम्यान, याआधी ‘एनआयए’ विशेष कोर्टाने आरोपी फखरुद्दीन याची निर्दोष सुटका केली होती.
पाटणा येथील बेउर तुरुंगातून आज सकाळी सर्व ९ दहशतवाद्यांना ‘एनआयए’ विशेष कोर्टात नेण्यात आले होते. त्यात हैदर अली, नुमान अन्सारी, मजीबुल्लाह, उमर सिद्दिकी, फिरोज अस्लम, इम्तियाज आलमसह 9 जणांचा समावेश होता. या खटल्यात १८७ जणांचे जबाब नोंदविण्यात आले.
नेमकं काय घडलं होतं..?
पाटणातील गांधी मैदानात २७ ऑक्टोबर २०१३ रोजी हुंकार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असणार असल्याची घोषणा या वेळी करण्यात आली होती.
इंडियन मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांनी 7 जुलै २०१३ रोजी बोधगया बॉम्बस्फोटानंतर पाटण्यातील गांधी मैदानात बाॅम्बस्फोट घडवून आणण्याचा कट रचला होता. मोदींच्या सभेत स्फोट घडविण्यासाठी दहशतवाद्यांनी सगळी स्फोटके रांचीमध्ये एकत्र केली.
बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी 8 दहशतवादी सकाळीच बसने रांचीहून पाटण्याला आले. त्यानंतर गांधी मैदान आणि पाटणा जंक्शन येथे साखळी बॉम्बस्फोट झाले. त्यात 6 जणांचा मृत्यू झाला, तर ८९ जण जखमी झाले होते.
पाटणा जंक्शनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 10 च्या टॉयलेटमध्ये मानवी बॉम्ब बनविताना झालेल्या स्फोटात एक दहशतवादी मारला गेला. पाटणा जंक्शन येथे ब्लास्टिंग करताना मोहम्मद इम्तियाज पकडला गेला. त्याच्या चौकशीत सगळा कट समोर आला.
या प्रकरणी २७ ऑक्टोबर २०१३ रोजी पाटणा पोलिस ठाण्यात प्राथमिक तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर ३१ ऑक्टोबर २०१३ रोजी या प्रकरणाचा तपास ‘एनआयए’कडे देण्यात आला. नंतर 1 नोव्हेंबर 2013 रोजी दिल्ली एनआयए पोलिस ठाण्यात पुन्हा तक्रार नोंदविण्यात आली.
अल्पवयीन मुलांसह १२ जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले. एका आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अल्पवयीन आरोपींना बाल न्यायालयाने याआधीच तीन वर्षांची शिक्षा सुनावली होती.
आता तब्बल 8 वर्षांनंतर या खटल्याचा निकाल लागला आहे. न्यायालयाने मुख्य सहा आरोपींना देशद्रोह, गुन्हेगारी कट, खून, हत्येचा प्रयत्न, UAPA कायद्यांतर्गत दोषी ठरविले.
📣 तुम्ही ग्रुप अॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511